जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:20 AM2018-05-21T06:20:35+5:302018-05-21T06:20:35+5:30

आपत्तीपूर्व नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात येणारी नालेसफाई म्हणावी तशी पूर्ण झालेली दिसत नाही.

Pre-monsoon works in the district slow pace | जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामे संथ गतीने

जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामे संथ गतीने

Next


अलिबाग : मान्सून लवकरच धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परंतु आपत्तीपूर्व नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात येणारी नालेसफाई म्हणावी तशी पूर्ण झालेली दिसत नाही. ३० मेपर्यंत तरी नालेसफाई पूर्ण होणार का असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे आराखडेही सहा तालुके वगळता अद्यापही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नसल्याने आपत्ती व्यवस्थापनानबाबत किती सजगता आणि जागरूकता आहे हेच यावरून दिसून येते.
रायगड जिल्ह्यामध्ये सरासरी साडेतीन हजार मिमी पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ््यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी असते. नद्या, नाले, ओढे, धरण दुथडी भरून वाहत असतात. पावसाच्या कालावधीत कोणतीही आपत्ती ओढवण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी आपत्तीबाबतचे पूर्वनियोजन करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आपत्तीचा आढावा घेण्यासाठी मध्यंतरी एक बैठकही आयोजित केली होती. या बैठकीमध्ये तालुकानिहाय आपत्ती नियोजन आराखडा सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले होते.
महाराष्ट्रातील अतिवृष्टी परिसरात रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, वीज पडणे, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती घडण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. रायगड जिल्हा मुंबई-पुण्याच्या जवळ असल्याने वाहतूक आणि बाजारपेठेच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रही झपाट्याने वाढलेले आहे. त्यामध्ये तळोजा, महाड, रोहे, धाटाव, खालापूर, पाताळगंगा या पट्ट्यांमध्ये रासायनिक कंपन्यांचे जाळे विणले गेले आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे, कोकण रेल्वेचे मार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग याच जिल्ह्यातून जात असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
जिल्ह्यातील सावित्री, गांधारी, काळ, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, बाळगंगा, भोगावती, गाढी, उल्हास या नद्यांना अतिवृष्टीने उधाण येते, तसेच खाड्याही भरून वाहतात. भरती आणि सतत पडणारा पाऊस आणि त्याच वेळी समुद्राला भरती आल्यास महाड, गोरेगाव, माणगाव, रोहे, अलिबाग तालुक्यातील काही सखल भागांमध्ये पाणी येऊन पूर परिस्थिती निर्माण होते. परिणामी गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, टायफॉईडच्या साथीने थैमान घातले होते.

८४ गावांना दरडीचा जास्त धोका
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ८४ गावांना दरडींचा धोका जास्त प्रमाणात आहे. जिल्ह्याला चक्रीवादळाचाही धोका आहे. २००९ साली फयान वादळामुळे घर आणि गोठ्यांचे नुकसान होऊन मोठी वित्त हानी झाली होती.
चक्रीवादळाचा धोका विशेष करून समुद्र किनारी असलेले अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यातील गावे आणि शहरांना आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुस्थिती असणे अत्यावश्यक आहे.
प्रत्येक तालुका ठिकाणच्या प्रांताधिकारी, तहसीलदार, नगर पालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य व्यवस्था, कंपन्या यांच्यासह अन्य घटकांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीचा मुकाबला करणे अतिशय सोपे जाते. मात्र अलिबाग, महाड, रोहे, माथेरान, पनवेल, कर्जत यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे, तर उर्वरित तालुक्यांचे काम सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.

नगर पालिका हद्दीतील नालेसफाईची कामे सुरू आहेत. आज घडीला ती किती टक्के पूर्ण झाली याचे मोजमाप करणे कठीण आहे. नालेसफाई वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हा नगर पालिका प्रशासन प्रमुख प्रभारी महेश चौधरी यांनी सांगितले.

काही नगर पालिका हद्दींमधील नालेसफाई सुरू झाली आहे, तर अद्याप काही ठिकाणी ती सुरू झालेली नाही. कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर, पावसाचे पाणी त्या नाल्यांमध्ये साचून शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती आपत्ती व सुरक्षा विषयक तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी व्यक्त केली.

आपत्तीचे आराखडे एक महिना आधीच जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर दिलेले आराखडे खरोखरच आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहेत का हे मॉकड्रीलच्या माध्यमातून तपासणे सोपे जाईल, आराखड्यातील बदलाची माहितीबाबत पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pre-monsoon works in the district slow pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.