प्रचाराची सांगता; पेणमध्ये सर्वत्र शांतता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:19 PM2019-10-19T23:19:40+5:302019-10-19T23:21:18+5:30
प्रतीक्षा मतदानाची । राजकीय तलवारी मॅन
पेण : १९१ पेण विधानसभा मतदारसंघात शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची सांगता झाली. गेले १५ दिवस रंणागणावर प्रचाराच्या रणधुमाळीत महायुती विरुद्ध आघाडी असा दुरंगी सामना असल्याने दोन्ही बाजूकडून एकमेकांची उणीधुणी काढून आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात होत्या. अखेर निवडणूक आयोगाची प्रचाराची मुदत संपल्याने आता राजकीय पक्षाच्या उमेदवारांना ‘नो स्टेटमेंट, नो कोमेन्टस’ या पद्धतीने येत्या ४८ तासांत शांततामय वातावरणात आपापले काम करावे लागणार आहे.
पेण विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे शेकाप उमेदवार धैर्यशील पाटील विरुद्ध महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या ताकदवान असल्याने लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी एकमेकांनी एकास एक या पद्धतीने सामना बरोबरीत सोडविलेला होता. यानंतर सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाची सांगता होताचक्षणी निवडणुका जाहीर झाल्या. गेले १५ दिवस प्रचाराचा धुमधडाका दोन्ही बाजूकडून उडवला गेला. महायुतीच्या सभेला स्टारप्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेणमध्ये झालेली सभा याशिवाय भाजपचे माधवराव भंडारी, आ. निरंजन डावखरे, आ. प्रशांत ठाकूर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार अनिल तटकरे, आ. अवधूत तटकरे या युतीच्या प्रमुख नेत्यांची प्रचारादरम्यान चौफेर फटकेबाजी झाली.
तर दुसरीकडे शेकापचे उमेदवार आ. धैर्यशील पाटील यांनी एक हाती प्रचार मोहीम राबवत आपले सर्व शिलेदार कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यामार्फत आपला राजकीय प्रचार सुरू केला होता. दोन वेळा आमदार होऊन तिसऱ्यांदा उमेदवारी करणारे धैर्यशील पाटील यांचे प्रतिस्पर्धी मात्र रवींद्र पाटील हेच आहेत. फरक एवढाच आता ते काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या तंबूत दाखल झाले. त्यामुळे प्रस्थापितांनी ही लढाई व त्याचा राजकीय प्रचार पेण, पाली, रोहा या तीन तालुक्यांत केला. या निवडणुकीत मतदार कोणाच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत टाकतात. हे २१ आॅक्टोबरला मतदानाच्या दिवशी मतपेटीतून दिसेल. मात्र, आज या निवडणूक महोत्सवाची सांगता होऊन आता सर्व यंत्रणा निवडणूक आयोगाच्या कक्षेत आल्या आहेत.
पुढील ४८ तासांत कोणत्याही राजकीय पक्षाला आपला प्रचार करता येणार नाही. यासाठी निवडणूक यंत्रणा सतर्क झाली असून, भरारी पथक व पोलीस यंत्रणेचा कडक बंदोबस्त, फौजफाटा कार्यरत झाला आहे.