बिरवाडी : सह्याद्री पर्वत रांगांतून कोसळणारे पांढरे फेसाळ पाणी आड्रई येथील धबधब्यात अनुभवायला मिळत असल्याने मुंबई, पुणे आणि गुजरात राज्यातून येणारे पर्यटक मोठ्याप्रमाणात महाड तालुक्यातील आड्रई धबधब्याला पसंती देत आहेत. या ठिकाणी जाणारा रस्ता हा डोंगरभागातून नागमोडी वळणे घेऊन जात असल्याने नैसर्गिक सौंदर्य व निसर्गातील हिरवळ अनुभवण्यासाठी पर्यटक वर्षासहलीकरिता येतात.आड्रई हे ठिकाण महाड शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. सह्याद्री पर्वत रांगांतून हा धबधबा पाहण्यासाठी तरुण पर्यटक मोटारसायकल, कार अशी खासगी वाहने घेऊन येत असतात. महाड शहरातून बिरवाडी मार्गे दहिवड, वाकी रस्त्याने या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी गेलेल्या पर्यटकांना कोकणातील पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी या ठिकाणी येथील स्थानिक नागरिकांनी उपलब्ध करून दिली आहे.या परिसराला स्थानिक नागरिक गणपतीचा वीरा या नावाने ओळखतात. या ठिकाणी थेट वाहनाने जाण्याची सुविधा असल्याने पर्यटक कुटुंबासह या ठिकाणी वर्षासहलीचा आनंद, कोकणातील पावसाचा आनंद लुटण्याकरिता गेले तीन-चार वर्षांपासून मोठ्या संख्येने येतात. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरते. मात्र, अतिवृष्टीच्या काळात या ठिकाणावरील धबधब्याच्या प्रवाहामध्ये पर्यटकांना उतरण्यास बंदी करण्यात येते. पावसाचा अंदाज घेऊन या ठिकाणी भेट दिल्यास वर्षासहलीचा मनसोक्त आनंद लुटता येईल.
आड्रई धबधब्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 3:57 AM