परजिल्ह्यातील भाज्यांपेक्षा स्थानिक भाज्यांना पसंती
By निखिल म्हात्रे | Published: May 3, 2024 04:36 PM2024-05-03T16:36:00+5:302024-05-03T16:36:28+5:30
ओले काजूगराचे दर सर्वाधिक असले, तरी अन्य भाज्यांचे दर मात्र परवडणारे असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद आहे.
अलिबाग : परजिल्ह्यातून बहुतांश भाज्या विक्रीला येत असल्या, तरी स्थानिक भाज्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही स्थानिक हंगामी भाज्यांना विशेष मागणी होत आहे. त्यामध्ये फणस कुयरी, नवलकोल, पावटा, ओले काजूगर, वेलवांगी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ओले काजूगराचे दर सर्वाधिक असले, तरी अन्य भाज्यांचे दर मात्र परवडणारे असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद आहे.
पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मेथी, पालक, मोहरी, चवळीची भाजी उपलब्ध असून, घेवडा, वाली, गवार, सिमला मिरची, हिरवी मिरची, कोबी, वांगी, पावटा, शेवगा शेंगा या स्थानिक शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी येत आहेत. कुयरी, वांग्याची भाजी तीळकूट घालून तयार केली जात असल्याने काळ्या तिळांनाही वाढती मागणी आहे. १० ते १५ रुपये पेला दराने तीळ विक्री सुरू आहे.
दर असे
पावटा : १८० ते २००
वांगी : ५० ते ६०
पालेभाज्या : १० ते १५
अन्य भाज्या : ७० ते ८०
स्थानिक/गावठी वांगी आकाराने मोठी व लांब असून, भाजी, भरीत करण्यासाठी वापर केला जातो. शिवाय चवीलाही ही वांगी चांगली असतात. ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. वांगी, पावटा, शेवगा शेंगा घालून संमिश्र भाजी तयार केली जात असल्याने या भाज्यांची विक्री अधिक होत आहे, लाल भोपळा, दुधी भोपळा, गवार, घेवड्यासह वाली शेंगांनाही मागणी होत आहे.
परजिल्ह्यातून उपलब्ध होणाऱ्या भाज्या बारमाही उपलब्ध असतात. स्थानिक भाज्या या हंगामी असतात. त्यामुळे त्यांना प्राधान्य देत आहोत. भाज्यांबरोबर काही फळेही खरेदी करतो. या भाज्या-फळांमधील आरोग्यवर्धक गुणांमुळे शक्यतो पैशांकडे पाहत नाही. तुलनेने अन्य भाज्यांपेक्षा दर परवडणारे आहेत.
- साधना कांबळे, गृहिणी
येथील स्थानिक शेतकरी विविध भाज्यांची लागवड करीत असल्याने या दिवसांत भाज्या मुबलक स्वरूपात उपलब्ध होतात. लाल मातीतील कोबी, सिमला मिरची, टोमॅटो, गवार, घेवड्याची चव वेगळीच आहे. त्यामुळे शक्यतो स्थानिक, गावठी भाज्यांची खरेदी करतो, पावट्याचा खप अधिक असल्याने दरही थोडे चढच आहे.
- कल्पना मळेकर, गृहिणी