वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असुन पनवेल महानगरपालिकेला सर्वोच्च स्थापनावर पोहचविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आज केले. पनवेल महानगर पालिकेची सूत्रे चितळे यांनी आज हाती घेतली.
लोकसभेच्या निवडणुकांच्या प्राश्वभूमीवर तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या बदली नंतर रिक्त असलेल्या आयुक्तपदी अखेर मंगेश चितळे यांची नियुक्ती करण्यात आली. मागील काही काळापासून पनवेलचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे होती. त्यांनी यशस्वीपणे आयुक्तपदाचा कारभार हाकल्यानंतर आयुक्तपदी चितळे यांची वर्णी लागल्यानंतर रसाळ यांनी आयुक्तपदाचा कारभार चितळे कडे सुपूर्द केला. कल्याण-डोंबिवलीच्या अतिरिक्त पदावरती कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल नगरपरिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यामध्ये मंगेश चितळे यांचे मोठे योगदान राहीले आहे. यावेळी त्यांनी पाणी प्रश्न व रस्ते क्राँकीटीकरण, उद्यानांचे सुशोभिकरण करून पनवेल स्वच्छ व सुंदर करण्यावरती त्यांनी भर दिला होता. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर काही काळ उपायुक्त म्हणूनही त्यांनी या ठिकाणी काम पाहिले आहे. त्यानंतर बारामती येथे मुख्याधिकारी, नगरविकास विभाग, पुणे पालिकेमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.
महानगरपालिका क्षेत्रामधील नागरी सुविधा अंतर्गत २९ गावांमधील स्मार्टसिटी अंतर्गत विकास कामे, स्वच्छता अभियान, पनवेल शहरातील पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेली झोपडपट्टी धारकांची पुनर्वसन योजना, सिडकोकडून महानगरपालिकेला होणारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक भूखंडांचे हस्तांतरण, पनवेल महापालिकेचे स्वराज्य मुख्यालयाचे काम करण्यास प्राधान्य असणार आहे. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य देणार असून पालिकेची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने नवीन नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यावर भर दिला जाईल.पनवेलला सर्वोच्च स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न मी करणार आहे.-मंगेश चितळे (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)