डॉक्टरांअभावी गरोदर मातेला गमवावे लागले बाळ; रायगड जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञच नाही
By राजेश भोस्तेकर | Published: March 24, 2023 06:21 AM2023-03-24T06:21:17+5:302023-03-24T06:21:52+5:30
सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता महिलेचा जीव वाचविणे महत्त्वाचे असून, या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ उपचार करत आहेत.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग : जिल्हा शासकीय रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका आदिवासी मातेला आपल्या बाळाला गमवावे लागल्याची घटना घडली आहे. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता महिलेचा जीव वाचविणे महत्त्वाचे असून, या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ उपचार करत आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या रायगड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टर जॉयती पांजा या एकमेव स्त्रीरोग तज्ज्ञ असून, सलग काम केल्यामुळे गुरुवारी त्या आल्या नव्हत्या. त्यामुळे निवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल फुटाणे हे उपचार करत आहेत.
पेण तालुक्यातील दुष्मिखार पाडा येथील आदिवासी वाडी येथील जागृती सुनील कातकरी ही आठ महिन्यांची गरोदर माता बुधवारी जिल्हा रुग्णालयात प्रसूती कक्षात दाखल झाली होती. महिलेचा जीव वाचविणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. अखेर लोकमतच्या प्रतिनिधीने रुग्णालयाचे निवृत्त स्रीरोग तज्ज्ञ डॉ. फुटाणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी या महिलेवरील उपचाराची जबाबदारी घेतली.
डॉ. भाग्यरेखा पाटील, (पोलादपूर) डॉ. स्वाती नाईक, (पनवेल), डॉ. प्रियांका म्हात्रे (पनवेल), धनंजय शिंदे (माणगाव) हे स्त्रीरोग तज्ज्ञ बऱ्याच काळापासून गैरहजर आहेत. त्यांना नोटीसा बजावल्या आहेत, अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली. तर मेडिकल कॉलेजला रुजू झालेले डॉक्टर हे रुग्णालयातही सुविधा देत आहेत. आमच्यापरीने आम्ही जसे डॉक्टर उपलब्ध होतील तशी मदत करीत आहोत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नाही ही वस्तुस्थिती आहे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर सध्या उपचार करीत आहेत. डॉक्टरांची भरती करावी याबाबत शासनाकडे मागणी केली आहे.
- डॉ. सुहास माने,
जिल्हा शल्यचिकित्सक
महिलेचे बाळ पोटात दगावले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. शुक्रवारी नॉर्मल डिलिव्हरी करू अन्यथा सिझर करावे लागेल.
- डॉ. अनिल फुटाणे, स्त्रीरोग तज्ज्ञ