ग्रामीण भागात रंगल्या क्रिकेट व कबड्डीच्या प्रीमियर लीग
By निखिल म्हात्रे | Published: January 28, 2024 07:06 PM2024-01-28T19:06:55+5:302024-01-28T19:07:37+5:30
प्रीमियर लीग पक्षाच्या किंवा त्या गावाच्या किंवा शहराच्या नावाने अगदी एखाद्या आळीच्या किंवा मंडळाच्या नावाने, तसेच एखाद्या व्यक्तीच्या समरणार्थ भरविल्या जात आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग - रायगड जिल्हा कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. या मातीत असंख्य मातब्बर कबड्डीपटू उदयाला आले आहेत. याबरोबर येथील लहानग्यांसह मोठ्यांना देखील क्रिकेटचे प्रचंड प्रेम आहे. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून कबड्डी व क्रिकेटच्या स्पर्धा बंद असल्याने खेळाडू व क्रीडा रसिकांचा प्रचंड हिरमोड झाला होता. मात्र आता हिवाळ्याच्या हंगामात सध्या जिल्ह्यातील गावागावात अगदी गल्लीबोळात देखील क्रिकेट आणि कबड्डीच्या प्रीमियर लीग रंगू लागल्या आहेत. येथे हजारो व लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात आहेत. शिवाय मोठ्या चषकांना देखील अधिक मागणी आहे. त्यामुळे क्रीडा प्रेमी व रसिकांच्या आनंदाला उधाण आले आहे. शिवाय यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना व गती देखील मिळत आहे.
या प्रीमियर लीग पक्षाच्या किंवा त्या गावाच्या किंवा शहराच्या नावाने अगदी एखाद्या आळीच्या किंवा मंडळाच्या नावाने, तसेच एखाद्या व्यक्तीच्या समरणार्थ भरविल्या जात आहेत. गावातील सरपंच ते मोठा नेता व पुढारी यासाठी बक्षिसांची रक्कम किंवा पूर्ण स्पर्धेचे आयोजन करतात. काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ देखील प्रीमियर लीग भरविण्यात येते. एकूणच या स्पर्धांमुळे गाव खेड्यातील प्रतिभावंत व होतकरू खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व जोडीला थोडेफार आर्थिक पाठबळ देखील मिळत आहेत. गावागावातील मैदाने किंवा शेतात या स्पर्धा भरविल्या जातात. त्यासाठी मंडप बांधले जातात. सोबत डीजे देखील लावला जातो. चांगले निवेदक बोलविले जातात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच यासाठी नेमले जातात. एकूणच सर्व कार्यक्रम भारदस्त केले जात आहेत. या लोकांना देखील रोजगाराची संधी मिळत आहे. तसेच यावेळी मंडप व डेकोरेशन वाले, वडापाव वाले, सरबत, पाणीवाले आदी व्यावसाईक व विक्रेत्यांना देखील चांगला धंदा मिळतो. आयोजकांच्या नावाचे व लोगो असलेले विविध टी शर्ट छपाई केली जाते. चषक विक्रेत्यांचा देखील चांगला व्यवसाय होत आहे. एकूणच या प्रीमियर लिगमुळे जणूकाही गाव खेड्यातील अर्थव्यवस्थेला उभारी आणि चालना सुद्धा मिळत आहे. तसेच पुढारी व नेते यांच्यामध्ये राजकारण व चढाओढ देखील रंगलेले पहायला मिळते.
मोठ्या चषकांना मागणी -
जिल्ह्यात सध्या मोठ्या चषकांना मागणी वाढली आहे. प्रीमियर लीगच्या कार्यक्रम पत्रिकेत देखील भव्य चषकाचा आवर्जून उल्लेख केलेला आढळतो. अगदी कमी रकमेच्या स्पर्धेत सुद्धा भव्य चषक पहायला मिळतो. परिणामी चषक विक्रेते देखील सुखावले आहेत.