तयारी अंतिम टप्प्यात : गोडवा वाढविण्यासाठी फराळ, मिठाई तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 02:58 AM2018-11-04T02:58:30+5:302018-11-04T02:59:00+5:30
दिवाळीत दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये फराळ, मिठाई अग्रक्रमांकावर असते. मिठाई आणि फराळ याशिवाय अन्य दुसरा पर्याय म्हणून चॉकलेटस् आणि सुकामेव्याचे गिफ्ट बॉक्स देण्यात येत आहेत.
मुंबई - दिवाळीत दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये फराळ, मिठाई अग्रक्रमांकावर असते. मिठाई आणि फराळ याशिवाय अन्य दुसरा पर्याय म्हणून चॉकलेटस् आणि सुकामेव्याचे गिफ्ट बॉक्स देण्यात येत आहेत. दिवाळीतील गोडवा वाढविण्यासाठी चॉकलेटस्च्या भेटवस्तूंची बरसात होत आहे. सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालयांतून चॉकलेटस्च्या भेटवस्तू मिळत आहेत. यासह सुकामेवा, बिस्किटची लज्जतदार भेट सहकाºयांना दिली जात असल्याचे चित्र तयार झाले आहे.
दादर, गिरगाव, वरळी, क्रॉफर्ड मार्केट, चेंबूर, मशीद बंदर येथील बाजारातील चॉकलेट आणि सुकामेव्यांची दुकाने अक्षरश: तुडुंब भरली आहेत. मिठाईला पर्याय आणि आरोग्यासाठी चांगले असल्याने सुकामेव्याची खरेदी केली जात
आहे. नातलग, मित्रपरिवार यांना भेट म्हणून चॉकलेट आणि सुकामेव्याला पसंती मिळत आहे. अनेक दुकानांमध्ये विविध प्रकारच्या चॉकलेट व सुकामेव्याचे विविध आकारांतील बॉक्स ठेवण्यात आले आहेत. सणासुदीतील गोडवा वाढविणारी ही चॉकलेटस् खाण्याचा मोह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होतो. त्यामुळे विविध चॉकलेट्सच्या खरेदीसाठी व आरोग्यदायी सुकामेव्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे.
चॉकलेटमध्ये सिल्क,
डायफ्रूट, बबल्स् चॉकलेट, गोल्ड चॉकलेट, चॉकलेट विथ् बिस्किट या प्रकारांतील चॉकलेटस् आकर्षक गिफ्ट बॉक्समध्ये पॅक करून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सुकामेव्याच्या बॉक्समध्ये बदाम, काजू, आक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुके, खारीक समाविष्ट आहे.
यंदा सुकामेव्याच्या किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्या आहेत. परंतु त्याचा परिणाम ग्राहकांच्या गर्दीवर पडलेला नाही. ग्राहक या बॉक्सकडे आकर्षित होऊन आपल्या पसंतीप्रमाणे गिफ्टची खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
पदार्थावरून ठरते बॉक्सची किंमत
सुक्यामेव्याच्या बॉक्सची किंमत आकारावरून आणि त्यात असलेल्या पदार्थांवरून ठरत आहे. चार सुक्यामेव्याचे पदार्थ असलेले गिफ्ट बॉक्स ३०० ते ५०० रुपये; तसेच सहा ते आठ सुक्यामेवाचे पदार्थ असलेले गिफ्ट बॉक्स ५०० ते २ हजारांपर्यंत मिळत आहेत.
ग्राहकांसाठी आकर्षक पॅकिंग
देशातील ब्रॅण्डेड कंपनीचे चॉकलेट बॉक्स बाजारात आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डसह हॅण्डमेड चॉकलेटचे बॉक्स उपलब्ध आहेत. दिवाळीनिमित्त अनेक चॉकलेट कंपन्यांनी आकर्षक पॅकिंग करून ग्राहकांसाठी गिफ्ट बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत.
बिस्किटे, नानखटाई, खारी बिस्किटे
गोड बिस्किटे, नानकटाई, खारी बिस्किटे यांचीदेखील सजविलेल्या बॉक्समधून विक्री केली जात आहे. छोट्या आकाराच्या बॉक्सची किंमत १०० ते २०० रुपये असून, मोठ्या बॉक्सची किंमत ५०० ते १ हजारपर्यंत आहे.
भाऊबीजेची भेट : भाऊबीजेसाठी भाऊ बहिणीना गोड भेट म्हणून चॉकलेट गिफ्ट बॉक्स देऊ शकतो. त्यासाठी अनेक ग्राहकांनी एक किलो, अर्धा किलोचे चॉकलेट गिफ्ट बॉक्सची आॅर्डर दिली असल्याचे विवेक शर्मा यांनी सांगितले.