मंदिरांमध्ये आषाढी एकादशीची तयारी शहरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन
By निखिल म्हात्रे | Published: July 16, 2024 05:10 PM2024-07-16T17:10:53+5:302024-07-16T17:12:16+5:30
यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर येथे गेल्या आहेत.
अलिबाग :आषाढी एकादशी आज साजरी होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील श्री विठ्ठल रखुमाई मंदरांत याची तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणावर शहरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर येथे गेल्या आहेत. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नाही, ते आपआपल्या शहरातील मंदिरांत दर्शन घेण्यासाटी जातात. ही संख्याही लाखोंच्या घरात असते. त्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे बोंबले विठोबा मंदिरासह अलिबाग शहराजवळच असलेल्या वरसोली येथील मंदिरास सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. येथेही मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. पहाटपासून येथे 'श्रीं'ना अभिषेक, काकडा, हरिपाठ, आदी कार्यक्रमांस भजन, पूजन आणि नामस्मरणादी सेवा सादर होणार आहेत. तसेच विठ्ठल मंदिरातही भाविक दर्शनासाठी गर्दी करतील. येथेही उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
उपवासाचे पदार्थ-फळांची आवक वाढली
आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी शहरात मोठ्या प्रमाणावर उपवासाच्या पदार्थांसह फळांची आवक वाढली आहे. उपवासाच्या पदार्थांचे भाव बऱ्यापैकी स्थिर असले तरीही फळबाजार मात्र तेजीत आहे. यासह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांनाही उपवासाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली आहे.
शाळांमध्ये उत्साह
उद्या शाळांना सुट्टी असल्याने मंगळवारीच शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना वारकरी वेशभूषेत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार मुलांनी धोतर-सदरा आणि मुलींनी नऊवारी साडी असा वारकरी पेहराव केला होता.