अलिबाग परिसरात पेपर इंडस्ट्री उभारण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:14 PM2020-02-11T23:14:59+5:302020-02-11T23:15:08+5:30
बहुराष्ट्रीय कंपनी : आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
आविष्कार देसार्ई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारी पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे. यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या अथवा देशपातळीवरील कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी आली तरी जिल्ह्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे, असे मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मात्र, आधीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच नव्याने भूसंपादन करा, असा सूर स्थानिक पातळीवर आळवला जात असल्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेला विरोध होणार असल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.
अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये एमआयडीसीमार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सुमारे एक हजार ३०० एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या परिसरामध्ये नेमका कोणता उद्योग उभारण्यात येणार आहे. याची माहिती स्थानिकांसह शेतकऱ्यांना नाही. प्रकल्प कोणता येणार आहे याचीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी जमिनी कशा काय द्यायच्या, असा सवाल येथील ग्रामस्थ परशुराम म्हात्रे यांनी केला आहे. एमआयडीसीने याआधीच टाटा पॉवर प्रकल्पासाठी सुमारे एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन केले आहे. प्रकल्प येण्याआधी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रकल्पच झाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पार धुळीला मिळाल्या आहेत. त्यामुळे आधी प्रकल्पग्रस्तांना दिलेली लेखी आश्वासने पूर्ण करा, त्यानंतरच नवीन संपादनास सुरुवात करा, अन्यथा भाजपकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये १०२ एकर परिसरामध्ये शेततलावांची निर्मिती केली आहे. त्या शेततळ्यांवर स्थानिकांचा रोजगार अवलंबून असल्याने सरकारने हा १०२ एकरमधील शेततळ्यांचा परिसर वगळून अन्य ठिकाणी कोणताही पर्यावरण पोषक प्रकल्प आणावा. त्याला आमचा विरोध नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या सुट्टीवर असल्याचे सांगितले.
जिल्ह्याच्या विकासासाठी होणार?
च्जिल्ह्याच्या विकासासाठी अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे.
च्याआधी रायगडमधील शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत गीते यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रत्येकी तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
च्पुढे त्यांची ही घोषणा हवेतच विरली होती. आता नवनिर्वाचित खासदांरानी अलिबागमध्ये पेपर इंडस्ट्री उभारण्याचे जाहीर केल्याने या ठिकाणी खरेच उद्योग उभा राहणार का? हा खरा प्रश्न आहे.
इंडोनेशियन कंपनी असल्याची चर्चा
च्अलिबाग तालुक्यामध्ये इंडोनेशियन कंपनी आपले हात-पाय रोवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी शहापूर-धेरंड परिसरामध्ये एका बड्या गुंतवणूकदाराने भेट दिल्याचे बोलले जाते. दिल्लीमधूनच या ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानेच या गुंतवणूकदारासोबत वरिष्ठ प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी उपस्थित होते, अशीही चर्चा आहे.