अलिबाग : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याला गुरूवारी नवीन वळण देण्याचा प्रयत्न झाला. आरोपींवर दोषारोप निश्चित करण्याबाबत न्यायालयाने भूमिका घेतली होती. त्या दोषारोपांना आरोपीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे येथील न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी आता १८ जुलै रोजी घेण्याचे जाहीर केले.अश्विनी बिद्रे खून खटल्यातील आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबत अलिबागच्या सत्र न्यायालयात मागील महिन्यात सुनावणी झाली होती. न्यायालयात आरोपीविरोधात खून करणे, संघटितपणे कट रचणे आणि खून करणे, अपहरण करणे, पुरावे नष्ट करणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे या कलमान्वये दोषारोप ठेवण्यात यावेत अशी मागणी विशेष सरकारी पक्षाने न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपींवर संबंधित दोषारोप ठेवणार असल्याचे सांगितले होते. यावर गुरुवारी न्यायालयामध्ये आरोपीविरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपांबाबत आरोपींच्या वकिलांनी हरकत घेत आरोपांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी न्यायालयात केली. यावर विशेष सरकारी वकिलांनी हरकत घेतली. आरोपींनीच या खटल्याची सुनावणी जलदगतीने होण्याबाबत उच्च न्यायालयातून आदेश आणले आहेत आणि तेच आता खटल्यामध्ये चालढकलपणा करत असल्याचे विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. याबाबत आता १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे
बिद्रे खून प्रकरणी उच्च न्यायालयात आव्हान देण्याची आरोपींच्या वकिलांची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 3:42 AM