पेण : अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेला माघ महिन्यातील माघी गणेशोत्सवासाठी पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यात उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या मूर्ती रंगकाम करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. मागणी छोटी, कलाविष्कार मोठा या कलेच्या क्षेत्रातील कौशल्य दाखवून देण्यासाठी मूर्तिकार सज्ज झाले आहेत. पेण शहर व जोहे-हमरापूर या कार्यशाळांमधून ३५ मोठ्या तर ३१५ छोट्या गणेशमूर्तींची मागणी झाली आहे. यामध्ये चार-पाच दिवसांत वाढदेखील होणार असल्याचे कार्यशाळांमधील कारागिरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बाप्पाचे आगमन होणार असल्याने मंगळवार, २८ जानेवारी रोजी कोकण व पुणे येथे गणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सवाला धूमधडाक्यात प्रारंभ होणार आहे. पेण शहर व ग्रामीण भागात दादर, हमरापूर विभाग, वाशी, वडखळ विभागातील प्रत्येक गावागावांत सार्वजनिक व घरगुती गणपती माघ महिन्यातील गणेश जयंतीनिमित्त भक्तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते. या वर्षी अंगारकी योग आला असून, मंगळवारी बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत माघी गणेशोत्सवाचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांना मागणी केल्यानंतर येत्या चार-पाच दिवसांत पुणे, रत्नागिरी, व रायगड जिल्ह्यातील मागणी केलेल्या गणेशमूर्तीचे रंगकाम, डोळ्यांची आखणी व इतर साजशृंगार सुरू आहे. गणेशभक्तांना मूर्ती ताब्यात देण्यात उणीव भासू नये, यासाठी कार्यशाळामध्ये लगबग सुरू झाली आहे. मंदिरातील उत्सवाने माघी सार्वजनिक व खासगी गणपती अशा दोनही रूपाने हा उत्सव गेले दशकभरात चांगले बाळसे धरत आहे. दरवर्षी यामध्ये वाढ व विस्तार होत असल्याचे पेणच्या मूर्तिकारांनी सांगितले.