कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ व ६ जूनला रायगडावर होणाऱ्या ३४२व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उत्सवकाळात रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या व्यवस्थेसाठी पाणी, आरोग्य, स्वच्छता यासह विविध मूलभूत सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. रायगडावर ६ जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे देशभरातून लाखो शिवभक्त व इतिहासप्रेमी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पूर्वतयारीसाठी रायगडावर पाहणी करण्यात आली. गडावरील पाण्याची व्यवस्था, अन्नछत्राचे नियोजन, राहण्यासाठी शेडस्, शौचालय, आदी गोष्टींची पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर महाड (जि. रायगड) येथे प्रांत कार्यालयात स्थानिक प्रशासनासोबत बैठक झाली. त्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, पिण्यासाठी लागणारे पाणी, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, मोबाईल स्वच्छतागृहे, विजेची व्यवस्था, वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता पार्किंगची योग्य व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, विविध वास्तूंची सजावट, सोहळा झाल्यानंतर स्वच्छता यासह विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, पोलीस निरीक्षक एम. व्ही. उगळे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ए. ए. तोरो, वासुदेव पाटील, संजय पेठे, राजेंद्र शिंदे, राजेश भोनकर, जिल्हा नियोजनचे सदस्य रघुवीर देशमुख, समितीचे सागर यादव, फत्तेसिह सावंत, हेमंत साळोखे, उदय घोरपडे, अमर पाटील, युवराज उलपे, प्रशांत दरेकर, संकेत जावळे, वैभव शेडगे, नीलेश घोलप, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी प्रशासन सज्ज
By admin | Published: May 30, 2015 12:46 AM