दासगाव : दरवर्षी महाड तालुक्यातील अनेक महसुली गावे, तसेच खेड्यांमध्ये उद्भवणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तसेच महसूल विभाग यांच्याकडून पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी घेत या टंचाईग्रस्त गावांना टॅँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षीच्या टँकरग्रस्त गावांच्या आराखड्यामध्ये यंदा दोन गावे वाढली असून एक वाडी कमी झाली आहे. येत्या काळात या पाणीटंचाई गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी महाड महसूल विभाग, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती विभाग सज्ज झाले आहेत. सध्या एकाच गावाचा प्रस्ताव मंजुरीसाठी महाड पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आला आहे.महाड तालुक्यात १८३ महसुली गावे आहेत, तर शेकडो वाड्या आहेत. तालुक्यात अनेक गावे व मोठ्या संख्येने वाड्या डोंगर भागात वसलेल्या आहेत. तालुक्यात धरणांची संख्या कमी, रखडलेली धरणांची कामे व ऐन एप्रिल व मे महिन्यात असलेल्या धरणाचे आटणारे पाणी पाहता गेल्या अनेक वर्षांपासून महाड तालुक्यात काही गावे खेड्यांमध्ये एप्रिल तसेच मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. दरवर्षी यावर मात करण्यासाठी टंचाईग्रस्त गावांचा पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत आराखडा तयार करून महसूल विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी घेऊन गरज असलेल्या गावांना तसेच खेड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.सध्याच्या परिस्थितीत महाड पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग तसेच महसूल विभाग हे येणाऱ्या पाणीटंचाई संकटाला तोंड देण्यास सज्ज झाला असून सध्या तालुक्यातील कावळे धनगरवाडी या गावाचा पाणीपुरवठा टँकरद्वारे सुरू करण्यासाठी प्रस्ताव आला आहे. लवकरच या गावाला टँकरद्वारे पाणी सुरू करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
टँकरग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन सज्ज
By admin | Published: March 25, 2017 1:34 AM