अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व म्हणजे २ हजार १७९ मतदान केंद्रांवर रवाना करण्यासाठी २ हजार ३५८ मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), २ हजार १७९ मतसंकलन यंत्रे (कंट्रोल युनिट) आणि २ हजार १७९ मतदान पावती यंत्रे(व्हीव्हीपॅट) यांची पूर्ण खातरजमा अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली, गुहागर या सहा विधानसभा मतदारसंघ मुख्यालय पूर्ण झाली आहते. सर्व यंत्रे रविवार, २१ एप्रिलपासून संबंधित मतदान केंद्रावर रवाना होण्याकरिता सज्ज झाली असल्याची माहिती रायगडचे उप जिल्हाधिकारी तथा ईव्हीएम-व्हीव्हीपॅट समितीचे प्रमुख रवींद्र मठपती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देषानुसार एका मतदानयंत्रावर (बॅलेट युनिट) १६ उमेदवार आणि एक ‘नोटा’(कुणीही उमेदवार योग्य नाही) पर्यायाकरिता व्यवस्था आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण उमेदवार १६ असल्याने दोन मतदानयंत्रे (बॅलेट युनिट) वापरावी लागणार आहेत. पहिल्या बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे, फोटो व चिन्हासह राहाणार आहेत. तर दुसऱ्या बॅलेट युनिटमध्ये केवळ ‘नोटा’ हा पर्याय राहणार आहे. परिणामी, रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व म्हणजे २ हजार १७९ मतदान केंद्रांवर दोन बॅलेट युनिट राहाणार असल्याचे मठपती यांनी सांगितले.संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनधोक होण्याकरिता तसेच मतदान यंत्रे मुख्यालयातून निघून मतदान केंद्रावर पोहोचणे व मतदानानंतर नेहुली-अलिबाग येथील मतमोजणी केंद्रातील स्ट्राँगरूममध्ये जमा होण्या करिता १७९ वाहनांतून क्षेत्रीय अधिकारी, ३३ भरारी पथक, ३० स्थिर पथके, २१ व्हिडीओ पथके आणि अन्य ११२ वाहनांतून पथके तैनात आहेत. त्यांना ३७५ वाहने उपलब्ध करून दिल्याची माहिती उप जिल्हाधिकारी तथा परिवहन व्यवस्थापन समिती प्रमुख जयराज देशपांडे यांनी दिली.>ईव्हीएम मशिन्स वापराची ३७ वर्षेदेशात केरळ राज्यामधील ७०-पारुर विधानसभा मतदार संघामध्ये १९८२ साली सर्वप्रथम ईव्हीएम मतदान घेण्यात आले. त्यास यंदा ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. १९८२ नंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभरात ईव्हीएम मशिनद्वारे मतदान करण्याची प्रणालीलागू करण्यात आली. महाराष्ट्रात १९९९ मध्ये एकत्रित घेण्यात आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीकरिता मुंबईमध्ये सर्व प्रथम ईव्हीएम यंत्रांचा वापर करण्यात आला.
सर्व मतदान यंत्रे तयार, बॅलेट युनिटमध्ये उमेदवार यादी अपलोड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:34 AM