शेतांमध्ये कडधान्य पीक तयार; नागोठणे तालुक्यातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 12:12 AM2021-02-07T00:12:43+5:302021-02-07T00:13:29+5:30
पोपटीच्या सिझनला सुरुवात
नागाेठणे : निडीचा प्रसिद्ध म्हणून ओळख असलेल्या वाल, पावटा या कडधान्यांची पिके काही अंशी उशिरानेच तयार झाली असल्याने, शहरातील खवय्यांमध्ये पोपटीच्या सिझनला त्या निमित्ताने सुरुवात झाली आहे.
डिसेंबरच्या दरम्यान अचानक पाऊस पडल्याने, या भागात लावलेल्या वाल-पावटा या कडधान्यांच्या पिकाला धोका पोहोचला होता. लावलेली पिके काही ठिकाणी नष्ट झाल्याने काही शेतकऱ्यांना या पिकांची पुन्हा लागवड करावी लागली होती. काही शेतांमध्ये पिके बहरली असली, तरी वेलावर फुलेच आली नसल्याने शेती या पिकांनी बहरली असतानाही, काही शेतात शेंगाच आल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या भागात ओलसर जमिनीतच हे पीक घेतले जाते व साधारणतः तीनशे ते चारशे एकर जमिनीत या पिकांची लागवड केली जाते, परंतु वाल पावटा कमी प्रमाणात पिकाला असल्याने पन्नास टक्केच पीक आले असल्याचे शेतकरी सांगतात.
आठ दिवसांपासून वाल-पावट्याच्या शेंगा शहरात विकायला यायला सुरुवात झाली असून, सुरुवातीला किलोचा भाव दीडशे रुपये इतका होता, परंतु चारपाच दिवसांत भाव शंभर रुपये इतका घसरला असून, हाच भाव यापुढेही स्थिर राहील, असे जाणकार सांगतात.
शेंगा झाल्या उशिराने उपलब्ध
शहरासह विभागात वाल किंवा पावट्याच्या शेंगांची ‘पोपटी’ करणे म्हणजे एक पर्वणीच असते. काही अंशी उशिरानेच या शेंगा उपलब्ध झाल्या असल्याने, शेंगांकडे डोळे लावून बसलेल्या खवय्यांचा जीव त्या निमित्ताने भांड्यात पडला आहे.