नववर्ष स्वागतासाठी पर्यटक सज्ज
By admin | Published: December 30, 2016 03:56 AM2016-12-30T03:56:30+5:302016-12-30T03:56:30+5:30
नववर्षाच्या स्वागतासाठी नाताळपासूनच पर्यटक मुरुड तालुक्यात येवू लागले आहेत. यामुळे मुरुडमधील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे.
बोर्ली-मांडला : नववर्षाच्या स्वागतासाठी नाताळपासूनच पर्यटक मुरुड तालुक्यात येवू लागले आहेत. यामुळे मुरुडमधील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. गुलाबी थंडी आनंद घेत पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. देशी-विदेशी पर्यटकांनी पर्यटनासाठी रायगड जिल्ह्याला अधिक पसंती दिली असून त्यांची सर्वाधिक पसंती ही मुरुड जंजिऱ्याला असल्याचे दिसून येत आहे.
उंच माड, पोफळी, निळसर समुद्र, सुंदर व स्वच्छ सागरी किनारा एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला गडद हिरवाईच्या सान्निध्यात पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. प्रवासी आणि पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवून मुरुड शहरातील काशिद, नांदगाव, बोर्ली, साळाव, बारशिव, चिकणी, विहूर, येसदे आदी ठिकाणच्या हॉटेलचे बुकिंग महिन्यापूर्वीच के ले असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली. साधारणपणे यावेळी दीड ते दोन लाखापर्यंत पर्यटक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्येच पर्यटकांना मुरुडमध्ये पर्यटन महोत्सवाचा आनंद मनमुराद लुटता येणार आहे.
यावर्षी दिवाळी हंगामात हॉटेल व्यावसायिकांना अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने विचारपूर्वक दर आकारणी करण्यात आली आहे. मुरुड तालुक्यात दीड हजारापासून तीन हजारापर्यंत रुमची बुकिंग होत आहे. बोर्ली परिसरातील काही हॉटेलमध्ये पाच हजार रुपयात जेवण सुद्धा देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी निव्वळ रुमचे भाडे आकारले जात आहे. पर्यटकांनी येथे येत असताना माहिती व आरक्षण व्यवस्थित केले असल्यास त्यांची गरैसोय होणार नाही, असेही काही हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
मुरुड तालुक्यातील काही हॉटेल रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांसाठी डीजे, रुम आर्केस्ट्रा, टॅटू स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, लावणी आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खाजगी बंगले सुद्धा बुक करण्यात आले आहेत. (वार्ताहर)
वाहतूक कोंडीची समस्या : अलिबागकडून येणाऱ्या जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना नागाव, रेवदंडा, चौल येथे वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक पोलीस कर्मचारी तैनात झाले आहेत. पोलीस पथकांनीही सुरक्षेच्या दृष्टीने आणि कु ठलाहीअनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना के ल्या असून चोख पोलीस बंदोबस्त यावेळी असणार आहे.