गणेश विसर्जनाकरीता पोलीस सज्ज
By admin | Published: September 14, 2016 04:33 AM2016-09-14T04:33:29+5:302016-09-14T04:33:29+5:30
अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सर्वच गणपतींचे विसर्जन करण्यात येते. त्यासाठी गुुरुवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असून परिमंडळ-२ मध्ये पूर्णपणे सज्ज आहे.
अरुणकुमार मेहत्रे , कळंबोली
अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सर्वच गणपतींचे विसर्जन करण्यात येते. त्यासाठी गुुरुवारी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असून परिमंडळ-२ मध्ये पूर्णपणे सज्ज आहे. शहरातील जवळपास दहा हजार गणरायांना यादिवशी निरोप दिला जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.
पनवेल आणि उरणमध्ये खाजगी व सार्वजनिक गणपतींची संख्या मोठी असून दहा दिवसांचे बाप्पांही दहा हजारांच्या घरात आहेत. गणरायांची प्रतिष्ठापनेपासून ते गौरी गणपती विसर्जन अतिशय शांतेतत पार पडले. यावेळी परिमंडळ-२ मध्ये पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखाली उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गुरुवारी दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येणार असून याकरीता पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. जवळपास साडे पाचशेहून अधिक पोलिसांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. बकरी ईद व अनंत चतुर्दशी एका पाठोपाठ आल्याने तीन दिवस पोलिसांच्या सुट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत. तसे आदेश नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी निर्गमीत केले आहेत.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९१५ गणपतींचे गुरुवारी विर्सजन करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. खारघरमध्ये १६०० गणरायांचे विसर्जन करण्यात येणार आहे. शहरी भाग असल्याने येथे जास्त बंदोबस्त लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त संवेदनशील असलेल्या कळंबोलीतही पोलिसांची करडी नजर असणार आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक कोंडीराम पोपेरे यांनी बंदोबस्तांचे नियोजन केले आहे. उरण विभागात उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी येथेही विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त राहणार आहे. खांदेश्वर, पनवेल शहर, कामोठे, तळोजा येथेही विसर्जनाच्या दिवशी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, याकरीता पोलीसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. सिडको वसाहतीत प्रत्येक सेक्टरला पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्या त्या पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी तसेच विर्सजन घाटावर टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. विसर्जनावर करडी नजर ठेवण्याकरीतो सीसी टिव्ही लावण्यात आले आहेत. त्याच्यावर पोलीसांचे नियंत्रण राहणार असल्याचे निलेवाड यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये या हेतून एक मार्गी पार्र्किं ग ठेवण्यात येणार असल्याची माहिती कळंबोली वाहतूक शाखेचे निरिक्षक गोरख पाटील यांनी दिली. विसर्जनघाटावर सूचना देण्याकरीता लाऊड स्पीकर, लाईट व स्टेजची व्यवस्था त्या त्या प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.