लोकसभेची तयारी, सुनील तटकरेंच्या विरोधात धैर्यशील पाटील?
By जमीर काझी | Published: March 6, 2023 09:33 AM2023-03-06T09:33:00+5:302023-03-06T09:36:22+5:30
शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपने पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पद्धतशीर व्यूहरचना आखली आहे
अलिबाग : शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपने पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पद्धतशीर व्यूहरचना आखली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यातील सत्तेत सहभागी असताना २०२४ मध्ये कमळ चिन्हावर जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी जोमाने काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यात शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हातात कमळ देण्यात आले आहे.
लोकसभेला रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात उमेदवारी देण्याच्या बोलीवर धैर्यशील पाटील यांनी पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपने सर्वप्रथम खा. तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांना सेनेतून पक्षात घेतले. पेण विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा लाल बावटा हाती घेतलेल्या धैर्यशील पाटील यांना २०१९ मध्ये पराभवाचा फटका बसला. तेव्हापासून त्यांच्या राजकारणाची दिशा बदलत चालली होती. त्यांची नाराजी लक्षात घेऊन शेकापने पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन वडखळला भरवून त्यांना मान देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला आहे.
अशी आहे व्यूहरचना
- मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने लोकसभेला तेच उमेदवार असतील. पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या सहा मतदारसंघांचा रायगड लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. यापैकी जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार शिंदेंच्या सोबत गेले आहेत.
- श्रीवर्धन मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची तर गुहागर मतदारसंघावर ठाकरे गटाची पकड आहे. महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्यानुसार तटकरेंची उमेदवारी निश्चित आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते ठाकरेंसोबत असले तरी त्यांना थांबावे लागेल अशी चर्चा आहे.