कर्जतमध्ये जमीन मोजणीत मृत शेतकऱ्याची उपस्थिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:03 AM2018-12-19T05:03:12+5:302018-12-19T05:03:34+5:30
कर्जत भूमी अभिलेख अधिकाºयांविरुद्ध तक्रार : बोगस सर्वेक्षण व जमीनमोजणी दस्तावेज प्रकरण
नेरळ : कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा येथे बोगस जमीन मोजणी करून शेतकºयांची फसवणूक केल्याबद्दल नेरळ पोलीस स्थानकात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. जमीन मोजणीकरिता सहा वर्षांपूर्वी मयत झालेला शेतकरी उपस्थित असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. इतकेच नव्हे तर या शेतकºयाच्या व अन्य दोघांच्या खोट्या सह्या करून त्यांच्या नावे जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करून कर्जत भूमी अभिलेखच्या अधिकाºयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील शेतकरी मालू बाळू डायरे यांनी केली आहे.
माहिती अधिकारातून या प्रकरणी आणखी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. खाड्याचा पाडा येथील सर्व्हे क्र मांक १८ ची पोटहिस्सा मोजणीची नोटीस बजावण्यात आली. ९ एप्रिल २०१२ रोजी मोजणीची तारीख होती. यात सीमाधारक कब्जेदार कृष्णा काळू खाडे हे उपस्थित दाखवून त्यांच्या स्वाक्षºया केल्या आहेत. प्रत्यक्षात कृष्णा खाडे यांचे २८ आॅगस्ट २००६ रोजीच निधन झाले आहे.
त्यांच्या मृत्यूची नोंद पाषाणे ग्रामपंचायत कार्यालयात १० सप्टेंबर २००६ मध्ये करण्यात आली आहे. तसेच सहहिस्सेदार मालू बाळू खाडे व कृष्णा काळू खाडे व वामन खंडू खाडे यांच्यादेखील खोट्या सह्या करून हे दस्तावेज तयार करण्यात आल्याचे डायरे यांनी तक्र ारीत नमूद केले आहे. इतकेच नव्हे हेच खोटे दस्तावेज सदर जमीन बिनशेती करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.
जमीन मोजणी प्रत्यक्षात झालीच नाही, तसेच बजावलेली नोटीस चतुर्सीमाधारक कब्जेदार यांना देण्यात आलेली नव्हती. कर्जत भू अभिलेखने कागदोपत्री दाखवलेली ही मोजणी व दस्तावेज खोटे आहेत. आमची फसवणूक केली असून या बोगस मोजणीमुळे आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो आहोत.
- मालू बाळू डायरे, तक्रारदार
गुन्हा दाखल करण्याची मागणी
च्या प्रकरणी तक्र ारदार मालू बाळू डायरे यांनी नेरळ पोलिसांकडे तक्रार दाखल करून भूमी अभिलेख कार्यालय, कर्जत येथील मोजणी अधिकारी यू. डी. केंद्रे व तत्कालीन उपअधीक्षक यांच्यावर ठपका ठेवून पदाचा गैरवापर करून खोटे दस्तावेज तयार करणे व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
जमीन मोजणीतील गैरव्यवहार प्रकरणी अर्जदार यांच्या अर्जानुसार भूमी अभिलेख विभागाकडे चौकशीसाठी प्रकरण पाठवण्यात आले आहे. सदर प्रकरणी भूमी अभिलेख विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने दोषी व्यक्तींविरु द्ध गुन्हा दाखल केला जाईल.
- सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक,
पोलीस स्थानक, नेरळ