रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ७ डिसेंबर २०२१ रोजी किल्ले रायगडला भेट देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना ते अभिवादन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत रायगड किल्ला आणि रोपवे देखील पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिली आहे.
राष्ट्रपती रायगडावर येत असल्याने त्यांच्या सुरेक्षेसाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जगासह देशाच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
रायगड जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करतात, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याला नक्कीच भेट देतात. त्यामुळे पर्यटकांची गौरसोय होवू नये म्हणूनच पोलिसांनी आधीच सूचना दिली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना काही दिवसापूर्वी रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते.
हे आमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारल्यानंतर ते ७ डिसेंबर २०२१ रोजी रायगडावर येत आहेत, अशी माहिती खासदार संभाजीराजे भोसले यांनी ट्विटरवरून दिली होती. राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले होते.