काराव गटात पक्षांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: February 17, 2017 02:14 AM2017-02-17T02:14:17+5:302017-02-17T02:14:17+5:30
पेण तालुक्यातील काराव जिल्हा परिषद गट व काराव पंचायत व शिहू गणात शेकाप, राष्ट्रवादी, भाजपा, मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली
वडखळ : पेण तालुक्यातील काराव जिल्हा परिषद गट व काराव पंचायत व शिहू गणात शेकाप, राष्ट्रवादी, भाजपा, मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
काराव गटात शेकाप-राष्ट्रवादी आघाडी आहे तर शिवसेना- काँग्रेस युती आहे. भाजपा स्वतंत्र निवडणुकीत उतरला आहे. काराव गटातून शेकाप- राष्ट्रवादी आघाडीकडून शेकापचे ज्येष्ठ नेते पेण पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती महादेव दिवेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस -शिवसेना युतीकडून काँग्रेसने परशुराम पवार यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपाने लक्ष्मण निरगुडा यांना उमेदवारी दिली आहे. काराव गणातून काँग्रेस-शिवसेना युतीकडून शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख नरेश गावंड यांना उमेदवारी दिली आहे. तर शेकाप- राष्ट्रवादी आघाडीकडून पेण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष परशुराम मोकल यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने पेण तालुका सचिव मनोहर पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने युवा कार्यकर्ता विकेश पाटील यांना उभे केले आहे, तर अपक्ष पांडुरंग तांडेल रिंगणात आहेत. शिहू गणातून शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक सुनीता खाडे रिंगणात आहेत, तर शेकापने पेण पं.स.चे माजी सभापती संजय भोईर यांच्या पत्नी मनीषा भोईर यांना उमेदवारी दिली, भाजपाने येथील भाजपाचे नेते हिरामण कोकाटे यांची पत्नी तृप्ती कोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. काराव जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात प्रमुख राजकीय पक्षांनी आपले महत्त्वाचे पदाधिकारी निवडणुकीत उतरविले असल्याने राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (वार्ताहर)