- जयंत धुळप। लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या गेल्या १४ वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयत्नातून जिल्ह्यातील गरोदर मातेकडून तिच्या मुलाला होणाऱ्या एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध करण्यामध्ये आरोग्य यंत्रणेला १०० टक्के यश आले असल्याची माहिती रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली आहे.रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रूग्णालये व नगरपालिका दवाखाने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी रूग्णालये यांच्या मार्फत मोफत एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली जाते. एचआयव्ही-एड्स विषयी जनजागृती केली जाते. तसेच एचआयव्ही-एड्सला प्रतिबंध केला जातो. २००३ ते २०१६ या १४ वर्षांचा अभ्यास रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या माध्यमातून करण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी दिली.२००३ मध्ये ८२७ गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी व समुपदेशन केले होते. त्यामध्ये ०.७ टक्के म्हणजे ६ गरोदर माता एचआयव्ही संसर्गित असल्याचे आढळून आले होते. तर २०१६ मध्ये एकूण ४४ हजार ५२ गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी व समुपदेशन करण्यात आले. त्यामध्ये०.०५ टक्के म्हणजे २४ गरोदर माता एचआयव्ही संसर्गित असल्याचे आढळून आले. १४ वर्षांत गरोदर मातेकडून तिच्या मुलाला होणारा एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध करण्यामध्ये आरोग्य यंत्रणेला १०० टक्के यश आल्याचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी सांगितले.२००२ ते २०१६ या गेल्या १४ वर्षांतील कालावधीचा अभ्यास करता, सर्वसामान्य जनतेमध्ये सन २००२ मध्ये १३८ लोकांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली असता त्यामध्ये ४२ टक्के म्हणजे ५८ एचआयव्ही संसर्गित असल्याचे आढळून आले. तर २०१६ मध्ये एकूण ७१ हजार ९० इतक्या लोकांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली असता त्यात ०.५७ टक्के म्हणजे ४०४ एचआयव्ही संसर्गित असल्याचे आढळून आले. २०१२ ते २०१७ पर्यंतची आकडेवारी पाहता एचआयव्ही समुपदेशन व तपासणीचे प्रमाण वाढलेले असून एचआयव्ही संसर्गित होण्याचे प्रमाण विक्रमी कमी झालेले आहे. गेल्या १५ वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले असल्याचे माने यांनी सांगितले.रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबविण्याकरिता तसेच एचआयव्ही-एड्सला प्रतिबंध करण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘होवूया सारे एकसंघ, करूया एचआयव्हीला प्रतिबंध’ या घोषवाक्यास अनुसरुन काम करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील जनतेने या कार्यक्रमामध्ये गेल्या १५ वर्षांत चांगला प्रतिसाद दिला आहे. येत्या काळात देखील जनतेने सक्रिय सहभाग घेवून एचआयव्ही-एड्स प्रतिबंध व जनजागृतीकरिता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकि त्सक डॉ. अजित गवळी यांनी केले आहे.
मातेकडून मुलाला होणाऱ्या एड्सला प्रतिबंध
By admin | Published: June 17, 2017 1:47 AM