१९५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव, लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांची कारवाई
By निखिल म्हात्रे | Published: April 2, 2024 04:33 PM2024-04-02T16:33:19+5:302024-04-02T16:33:41+5:30
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
अलिबाग : आगामी लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात १४९, १०७, ११० सी.आर.पी.सी कायद्यांतर्गत १९५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव रायगड पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे तसेच निवडणुकीदरम्यान शांततेचे आवाहनही केले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दरम्यान, याच काळात ज्यांच्यामुळे निवडणुकीदरम्यान गोंधळ होण्याची शक्यता आहे, अशा १९५ जणांविरुद्ध तात्पुरत्या स्वरूपातील कारवाईचा हा प्रस्ताव आहे. यावर अंतिम प्रक्रिया सुरू असून, लवकरच जिल्हा प्रशासनाकडून यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
२७६ बैठका
जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रभारी अधिकारी यांनी १ हजार ५३ गाव भेट घेतली तसेच मंडळाचे पदाधिकारी व शांतता/मोहल्ला कमिटी यांच्या २७६ बैठका घेतल्या व निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन नागरिकांना केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, दंगेखोरांना १४९ अंतर्गत नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. १०७, ११० अन्वये १९५ जणांवर कारवाई करून लेखी करारपत्र घेत त्यांना योग्य ती समजही देण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या काळात शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.