शेणखताला आला सोन्याचा भाव; एका ट्राॅलीला चार हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:23 PM2020-12-17T23:23:39+5:302020-12-17T23:23:42+5:30

रासायनिक खतांचाही भाव वाढला

The price of gold has gone up | शेणखताला आला सोन्याचा भाव; एका ट्राॅलीला चार हजार रुपये

शेणखताला आला सोन्याचा भाव; एका ट्राॅलीला चार हजार रुपये

googlenewsNext

- निखिल म्हात्रे

अलिबाग : गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांकडून रासायनिक खताचा अमर्याद वापर झाला होता. यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ न होता उलट जमिनीचा पोत खालावून शेतीक्षेत्र क्षारपड बनले जात होते. हे शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन गेल्या चार-पाच वर्षांपासून कसदार जमिनीचा पोत ढासळू नये यासाठी सेंद्रिय शेती पिकविण्यावर भर दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासूनच या खताचे दर हे गगनाला भिडले आहेत. पाच वर्षांपूर्वी ३००-४०० रुपये बैलगाडी इतका दर असणारा सध्या हजारावर पोहोचल्याने गावांमधील शेतकऱ्यांना शेती पिकविणे अडचणीचे ठरू लागले आहे. रासायनिक खताचे दर परवडणारे नसल्याने व रासायनिक खतापासून मिळणाऱ्या लिंक जोड खताची बचत होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत शेणखताच्या वापरावर अधिक भर दिला आहे. 
यंदा कृषी खात्याकडे उपलब्ध होणाऱ्या सबसिडीवरील सर्व प्रकारच्या खतांचाही शेतकऱ्यांनी सर्वाधिक लाभ घेतला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जवळजवळ ५० टक्के शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या खताचा व विविध योजनांचा लाभ मिळवून घेतला आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर लक्षात घेऊन शेतकऱ्याने कृषी खात्याकडून मिळणाऱ्या खताला सर्वाधिक पसंती दिली आहे.

रासायनिक खतांचे पिकांवर दुष्परिणाम
शेतीमध्ये रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापीक होण्याचा धोका संभवतो. पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो. रासायनिक खतांमुळे पाण्याचे स्रोतही दूषित होतात. जमिनीतील कस टिकवून  ठेवण्यासाठी उपयुक्त जीवाणूंना मारक ठरतात. परिणामी, शेतीला नुकसान पोहोचते. 

शेणखताचा फायदा
शेणखतामध्ये जमिनीला पूरक असे नत्र, स्फुरद, पलाश असते. सेंद्रिय कर्ब हा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर ठरते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात वाढ होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. 

रासायनिक आणि शेणखतांचे दर 
रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एका ट्रॉलीच्या शेणखताचा दर हा एक हजार रुपये इतका असून, या ट्रॉलीमध्ये सर्वसाधारण तीन बैलगाड्या शेणखत बसते. त्यामुळे गाडीचा एक हजार रुपये इतका दर झाल्याने शेतकरी धायकुतीस आला आहे. 

Web Title: The price of gold has gone up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.