गूळ, तीळ, साखरेचे भाव पाच टक्क्यांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 12:41 AM2021-01-03T00:41:34+5:302021-01-03T00:41:42+5:30
संक्रांतीमुळे बाजारपेठेत गर्दी वाढली, यंदा रेडीमेडला मागणी नाही
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या सणाला गोडधोड म्हणजेच तीळगूळ खाण्याची परंपरा आहे. तीळ, गूळ आणि साखर यांचे एकत्रित मिश्रण करून तीळगूळ सर्वांना वाटप केले जाते. याकरिता विशेषतः गृहिणींची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असते. या वर्षी बाजारपेठेत तीळगुळाचे साहित्य खरेदी करण्याची रेलचेल सुरू झाली आहे.
यावेळी तीळगुळाच्या साहित्याचे भाव ५ टक्क्यांनी वाढले आहेत. मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात किराणा मालाचा साठा अपुरा होत होता. मात्र, परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. बाजारपेठेत मालाचा तुटवडा नाही. तीळ १४५ ते १५० रुपये प्रति किलो, गूळ ५० ते ६० रुपये प्रति किलो आणि साखर ३५ ते ६० रुपये प्रति असा भाव आहे. कोरोनामुळे रेडिमेड तीळगुळाची मागणी खालावल्याने अनेक बचत गटांना व दुकानदारांना फटका बसला आहे.
तीळ भाव
तिळाचे भाव प्रति किलो १४५ ते १५० रुपयापर्यंत आहेत. कोरोनामुळे बाहेरील पदार्थ खरेदी करण्याचा काळ कमी झाल्याने घरातच तीळगूळ बनविण्यास महिला वर्ग प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने महिलांनी तयारी सुरू केली आहे.
गूळ भाव
तीळगुळासाठी आवश्यक असलेल्या चिकी गुळाचा भाव प्रति किलो ५० ते ६० आहे. मागच्या वर्षीच्या आणि यंदाच्या भावामध्ये जास्त तफावत नसल्याचे काही गृहिणींचे म्हणणे आहे.
साखरेचे भाव
साखरेचे भाव प्रति किलो ३५ ते ६० रुपयांपर्यंत आहेत. वेगवगेळ्या प्रकारच्या साखरेचा यामध्ये समावेश आहे. त्यानुसार, गृहिणी साखर खरेदी करीत आहेत.
तीळगूळासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. आम्ही दरवर्षी काही प्रमाणात रेडिमेड तीळगूळ घेतो. मात्र, या वर्षी घरीच बनविणार आहोत. भाववाढ झाली अथवा कमी झाली, तरी परंपरांगत सण साजरा करणारच.
- वैशाली ठाकूर, गृहिणी
तीळगुळासाठी लागणारे तीळ, गूळ आणि साखर आदींचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत सारखेच आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही भाववाढ किंचित झालेली आहे
- महेंद्र म्हस्कर, व्यापारी