प्राथमिक शाळेचे विद्यार्थी गणवेशापासून वंचितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:14 AM2018-08-18T03:14:07+5:302018-08-18T03:14:11+5:30
महाड तालुक्यात शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप शासनाकडून गणवेशाकरिता देण्यात येणाऱ्या पैशाचा पत्ताच नसल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.
- सिकंदर अनवारे
दासगाव - महाड तालुक्यात शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप शासनाकडून गणवेशाकरिता देण्यात येणाऱ्या पैशाचा पत्ताच नसल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. विद्यार्थ्यांकरिता काढण्यात आलेल्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार होती, मात्र अद्याप बँक खाती रिकामीच आहेत. बँक खात्यामध्ये पैसा जमा न झाल्याने विद्यार्थ्यांना गतवर्षाचेच गणवेश वापरावे लागत आहे.
शासनाने गेली तीन वर्षांपासून मागासवर्गीय घटकातील मुले, सर्व मुली, दारिद्र्य रेषेखालील मुले अशा मुलांना मोफत गणवेशाची सुविधा निर्माण करून दिली आहे. या योजनेअंतर्गत या घटकातील मुले तसेच मुलींना दोन गणवेश दिले जातात. प्रथम वर्षी शासनाने या लाभार्थी मुलांना कापड दिले आणि शिलाई रक्कम त्यांना देण्यात आली. दुसºया वर्षापासून प्रतिमुलामागे दोन गणवेशाकरिता ४00 रुपये शासन देत आहे. शाळा समित्यांकडेच गणवेश खरेदीची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र गेल्या वर्षापासून यामध्येही बदल करण्यात आला आहे. शासनाच्या गणवेश खरेदीकरिता येणारे पैसे हे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्यात आले आहे. वास्तविक पाहता शासनाने गणवेश खरेदीकरिता लागणारे पैसे हे मे महिन्यातच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित होते, मात्र दोन महिने उलटून देखील महाड तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले दिसून येत नाही. त्यामुळे यंदा जुनाच गणवेश घालून विद्यार्थी शाळेत येत आहेत.
महाड तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ३३३ शाळा आहेत तर या प्राथमिक शाळांमधून जवळपास ९००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी मागासवर्गीय, दारिद्र्य रेषेखालील आणि सर्व मुलींना जून महिन्यात गणवेश मिळणे क्र मप्राप्त होते, मात्र शासनाने गत वर्षापासून या प्रक्रि येत बदल करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच थेट पैसे जमा केले जाणार आहेत. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढण्यात आले असून यामध्ये बँक खाते उघडल्यापासून एक रुपयाही जमा झालेला नाही. शासनाने गणवेश खरेदीमधील घोटाळा लक्षात घेवून अखेर हा निर्णय घेतला असला तरी यावर्षी अद्याप गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. यामुळे प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांकरिता गणवेश मिळावा याकरिता दानशूरांकडे मागणी करत आहेत. अनेक शाळांमधील विद्यार्थी जुना गणवेश घालून शाळेत येत आहेत.
नव्याने दाखल झालेल्या मुलांकडे गणवेशच नसल्याने दैनंदिन वापरातील कपडे घालूनच हे विद्यार्थी शाळेत येत आहेत. महाड तालुक्यातील बहुतांश शाळा या ग्रामीण आणि दुर्गम भागात वसलेल्या शाळा आहेत. यामध्ये शेतकरी, मजूर, आणि अल्प घटकातील पालकांचीच मुले शिक्षण घेत आहेत. अशा पालकांना आपल्या पाल्याला कपडे, शैक्षणिक साहित्य घेणे शक्य नसले तरी ग्रामीण भगाातील पालक आपल्या कष्टातील पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात पुढे असतात. शासनाच्या या सुविधेचा लाभ शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मिळत नसल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते.
प्राथमिक शाळांतील मुलांना देण्यात येणाºया गणवेश प्रक्रि येत यावर्षीपासून बदल झाला आहे. या बदल प्रक्रि येमुळेच मुलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास विलंब लागला आहे.
- शैलजा दराडे, जिल्हा शिक्षण अधिकारी अलिबाग