प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : हजारो शेतकऱ्यांच्या नोंदीत चुका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:10 AM2019-11-30T01:10:00+5:302019-11-30T01:10:23+5:30
केंद्र सरकाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात एक लाख २१ हजार २९३ शेतकऱ्यांची संख्या आहे.
- आविष्कार देसार्ई
अलिबाग : केंद्र सरकाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात एक लाख २१ हजार २९३ शेतकऱ्यांची संख्या आहे. केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यातील रक्कम अदा करताना लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेशी संलग्न असल्याची अट घातल्याने त्यातील तब्बल ५० हजार शेतकºयांच्या आॅनलाइन नोंदींमध्ये काही तांत्रिक चुकांची दुरुस्ती ३० नोव्हेंबरपर्यंत करावी लागणार आहे. त्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
१ आॅगस्ट २०१९ पासून पात्र लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यालाच पीएम किसान योनजेचा सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार होता; परंतु राज्यस्तरावर जवळपास ५० लाख पीएम किसान योजनेमधील पात्र लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक नसल्यामुळे बरेच लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांचा विचार केल्यास तो आकडा ५० हजार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
रायगड जिल्ह्यातील शेतकºयांनी आधार कार्ड लिंक केलेले असले, तरी अर्ज, बँक खाते आणि प्रत्यक्ष आधार कार्डवरील नावांमध्ये तफावत असल्याचे आढळले आहे. त्याची संख्याही ५० हजार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे चिटणीस विशाल दौंडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांना पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला आहे; परंतु या पुढील मिळणारा लाभ हा आधार कार्ड लिंक असल्याशिवाय दिला जाणार नाही, असा आदेशच केंद्र सरकारने काढला असल्याने लाभार्थ्यांनी लवकरच दुरुस्ती करणे गरजेचे आहे. लाभाची रक्कम खºया लाभार्थ्यांना मिळते का हे पाहण्यासाठी आधार कार्डची अट घालण्यात आली आहे.
पीएम किसान पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांना नावे आधार कार्डप्रमाणे दुरु स्त करण्यासाठी फार्मर कॉर्नरमध्ये ‘आधार फेल्युअर रेकॉर्ड’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधेमार्फत योजनेच्या लाभार्थ्यांना पोर्टलवर जाऊन स्वत: त्यामध्ये दुरु स्ती करू शकतात, असेही दौंडकर यांनी स्पष्ट केले.
आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थ्यांना आधार दुरु स्तीसह अन्य सर्व सेवा उलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शेतकºयांना आधार दुरुस्तीसाठी दहा रुपये इतके शुल्क भरून आपले नाव आधार कार्डवरील नावाप्रमाणे दुरु स्त करून घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुरुस्तीसाठी आजचा शेवटचा दिवस
नोंदणीकृत शेतकºयांची पीएम किसान पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीनुसार असलेले नाव आणि आधार कार्डवर असलेले नाव यामध्ये विसंगती आहे, अशा शेतकºयांना १ डिसेंबर २०१९ पासून सरकारकडून चौथ्या हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार नाही. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या नावात विसंगती आहे, अशा लाभार्थ्यांच्या यादी संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
तरी सर्व लाभार्थ्यांनी तेथे जाऊन आपले नाव त्या यादीमध्ये तपासून पाहवे. लाभार्थ्यांचे नाव दुरु स्ती यादीमध्ये असल्यास आपले आधार कार्ड व बँक खाते पुस्तिकेची छायाप्रत नजिकच्या तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालयामध्ये जमा करून आपले नाव, आधार कार्डवरील नावाप्रमाणे ३० नोव्हेंबरपर्यंत दुरु स्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असल्याचे जिल्हा प्रशासनाचे चिटणीस विशाल दौंडकर यांनी सांगितले.