कर्जत - रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल विविध माध्यमातून पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शेकडो प्रवाशांच्या समस्या मार्गी लागल्या आहेत. त्यांच्या पाठपुराव्याची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेतल्याने त्यांच्यासह अनेक रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.ओसवाल यांनी कर्जत - पनवेल रेल्वे मार्गावर लोकल प्रवासी वाहतूक सुरु व्हावी याकरिता तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली व लवकरात लवकर लोकल सेवा सुरु करावी अशी कर्जतकरांच्या वतीने मागणी केली होती. कल्याण - मुंबई दरम्यान ५३ टक्के काम झालेली पाचवी व सहावी रेल्वे लाइन पूर्ण झाल्यास ७५ लाख रेल्वे प्रवाशांना लाभ होईल, हे त्यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जत स्थानकावर अधिकृतपणे थांबाव्यात. पुणे एन्डकडे असलेल्या जिन्याच्या पायऱ्या असल्या तरी मुंबई एन्डकडे असाव्यात आदींसह इंडिकेटर, एटीव्हीएम म्हणजे स्मार्ट कार्ड मशीन भिसेगावकडे सुरु करावी, आदी मागण्यांसाठी त्यांनी पाठपुरावा केला.नांदेड - पनवेल एक्स्प्रेसला कर्जतला तांत्रिक थांबा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांनी रेल्वे समस्यांचे निराकरण करण्यासाठी संपर्क साधून प्रयत्न केला. स्मार्ट मशीनवर ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकीट मिळावे तसेच एक्स्प्रेस गाड्यांचे कर्जत - कल्याण, ठाणे, मुंबई तिकीट मिळावे यासाठीही त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. याबाबत ते माहितीच्या अधिकारात रेल्वे प्रशासनाला माहिती विचारून त्याची अधिकृत माहिती मिळावून नंतर त्याबाबत प्रश्न सुटण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. दिल्ली दरबारी सुद्धा समस्यांचे निवारण व्हावे यासाठी पत्राद्वारे पाठपुरावा केला.पंकज ओसवाल यांचे सातत्य आणि पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. यांच्या वडिलांनीसुध्दा प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले.- प्रभाकर करंजकर, माजी अध्यक्ष,कर्जत रेल्वे प्रवासी संघटनामाझ्यासारख्या सामान्य माणसाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याने मी भारावून गेलो असून यापुढेही रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करेल.- पंकज ओसवाल,सामाजिक कार्यकर्ता
रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबातच्या पाठपुराव्याची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:42 AM