महाड : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आरती वानखेडे यांना निलंबित करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. पंच्याहत्तर लाखांच्या अपहाराबरोबर अनेक आरोपांचा ठपका डॉ. वानखेडे यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. प्राचार्यपदाचा पदभर डॉ. धनाजी गुरव यांच्याकडे सोपवण्याच्या सूचना संस्थेने दिल्या आहेत.संस्थेचे विश्वस्त एम. एस. मोरे यांच्या आदेशानुसार, वानखेडे यांची सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र एम. एस. मोरे यांना संस्थेतून काढून टाकण्यात आलेले असून, त्यांचे आदेश घेऊन वानखेडे यांनी प्राचार्य पदाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला असल्याचे संस्थेने एका पत्रकात म्हटलेले आहे. १५ दिवसांपूर्वी डॉ. धनाजी गुरव यांच्या न्यायालयीन निर्णयानंतर संस्थेने प्रभारी प्राचार्या वानखेडे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या जागी पूर्वीचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांची नियुक्ती केली आहे.प्राचार्यपदाच्या कार्यकाळात डॉ. आरती वानखेडे यांनी आयडीबीआय बँकेच्या महाड शाखेत महाविद्यालयाचे बेकायदेशीरपणे खाते उघडून लाखो रुपयांची उलाढाल केली असल्याची बाब उघडकीस आली. निलंबित विश्वस्त एम. एस. मोरे यांच्याशी संगनमत करून त्यात ७५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका वानखेडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
प्राचार्य आरती वानखेडे निलंबित
By admin | Published: October 10, 2015 11:37 PM