जयंत धुळप / अलिबागराज्याच्या फलोत्पादनाच्या नकाशावर रायगड जिल्ह्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील निर्यातक्षम हापूस आंब्यांच्या उत्पादनामुळे रायगड हा ‘अॅग्री एक्स्पोर्ट झोन’ मध्ये समाविष्ट आहे. फलोत्पादनाखाली जिल्ह्यातील ६९ हजार ०३० हेक्टर क्षेत्र आहे. सन १९९०-९१ पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही जिल्ह्यातील फलोत्पादनास प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून देशभरात निवडक जिल्ह्यात फलोत्पादनास प्राधान्य देण्यात आले आहे. याकरिता आवश्यक वित्तीय पतपुरवठा राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून करण्याच्या धोरणास अनुसरून रायगड जिल्ह्याच्या ‘संभाव्यतायुक्त ऋण योजना-२०१७-१८’ मध्ये जिल्ह्यात फलोत्पादन विकासाकरिता ३९ कोटी ३१ लाख ६६ रुपयांचे वित्त नियोजन करण्यात आले असल्याने, जिल्ह्यातील फलोत्पादन विकासाचे नवे पर्व दृष्टिक्षेपात आले आहे.कोकणात विशेषत: रायगड जिल्ह्याच्या किनारी भागात मसाल्याच्या पिकाचे उत्पादन घेण्यात येते. यामध्ये काळी मिरी, जायफळ, दालचिनी, लवंग या मसाल्याच्या पिकांचा समावेश आहे. सन २०१४-१५ मध्ये केवळ २५ हेक्टर क्षेत्रात मसाल्याच्या पिकांचे २२.७९ मेट्रिक टन उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले होते. जिल्ह्यातील सुपारी ही ुप्रसिद्ध असून, सुपारी उत्पादकांच्या तीन सहकारी सोयायट्या मुरुड, चौल, नागाव, अलिबाग येथे अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून थेट बाजारपेठेची व्यवस्था बागायतदारांनी स्वत:च केली आहे. त्यामुळे मसाल्याची पिके आणि सुपारी उत्पादनाच्या वृद्धीला येथे असणारी मोठी संधी विचारात घेऊन बँकांनी त्याकरिता वित्त नियोजन केले आहे.जिल्ह्यात गुलाब, कार्नेशन, जर्बेरा अशा निर्यातक्षम फुलांचे मोठे प्रकल्प आहेत. मुंबई ही शेजारील मोठी बाजारपेठ असून तेथूनच अल्पकालावधीत उपलब्ध होणारी निर्यात सेवा हे डोळ््यासमोर ठेवून पुष्प निर्मितीत व्यावसायिक पद्धतीने उतरून कर्जत, पेण, खालापूर, पनवेल, अलिबाग तालुक्यांत पुष्प निर्मितीकरिता ग्रीन हाऊस प्रोजेक्ट करण्यात आले आहेत. यामधील मोठी व्यावसायिक संधी विचारात घेऊन बँकांनी त्यास वित्तपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
रायगड जिल्ह्यात फलोत्पादनाला प्राधान्य
By admin | Published: March 24, 2017 1:17 AM