मांडवा बंदरात खाजगी बोटीला लागली आग, बोट जळून खाक, लाखोंचे नुकसान
By राजेश भोस्तेकर | Published: December 2, 2023 03:34 PM2023-12-02T15:34:31+5:302023-12-02T15:34:52+5:30
दोन जण किरकोळ जखमी
अलिबाग : मुंबई गेटवे येथून मांडवा बंदरात दाखल झालेल्या एका खाजगी स्पीड बोटीला अचानक आग लागून बोट जळून खाक झाली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र बोटीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मांडवा समुद्रात स्पीड बोट अपघाताची ही पहिलीच घटना आहे.
बेलवेडर नामक ही खाजगी स्पीड बोटच्या मालकाला शनिवारी २ डिसेंबर रोजी घेऊन चालक हा गेटवे येथून मांडवा बंदरात साडे बारा वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. प्रवासी यास उतरवून चालक हा बोटला बाजूला नेऊन नांगर टाकण्यास नेत असताना बोटीमध्ये एसीसाठी असलेल्या जनरेटच्या जंक्शनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. आग लागताच बोटीतील दोघा जणांनी त्वरित समुद्रात उडी मारून आपला जीव वाचवला या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या घटनेमुळे जेट्टीवर काहीकाळ गोंधळ उडाला होता. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने आग नियंत्रणात आणल्याची माहिती मांडवा येथील बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी दिली. दरम्यान, ही स्पीड बोट जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.