राखीव उद्यानातून नेली खासगी पाइपलाइन, ग्रामस्थांमधून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:16 AM2019-07-18T00:16:07+5:302019-07-18T00:16:13+5:30
शहराच्या लगत असलेले आणि डोमॅटरी सिटीत समाविष्ट असलेल्या ममदापूर गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे.
- कांता हाबळे
नेरळ : शहराच्या लगत असलेले आणि डोमॅटरी सिटीत समाविष्ट असलेल्या ममदापूर गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभे रहात असताना त्याठिकाणी उद्यानासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आलेला आहे. मात्र राखीव भूखंडाचा स्वत:साठी वापर करत एका बिल्डरने त्या उद्यानाच्या भूखंडातून बिल्डिंगसाठी पाइपलाइन नेली आहे. यासाठी कोणाची परवानगी देखील न घेतली नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळने शहरीकरणाकडे कधीच वाटचाल सुरु केली आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून उपनगरीय शहरांना नेरळ जोडले गेल्याने या ठिकाणी काहीच वर्षात झपाट्याने नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाचा विचार करत शासनाच्या नगरविकास विभागाने याठिकाणी नेरळ विकास संकुल प्राधिकरण लागू केले. या प्राधिकरणात नेरळजवळची ममदापूर बोपेले, धामोते या गावांचा देखील समावेश केल्याने अल्पावधीत या ठिकाणी मोठमोठे गृहप्रकल्प साकारण्यास सुरवात झाली. त्यामध्ये ममदापूर येथे उद्यानासाठी दीड एकराचा भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. ११ नोव्हेंबर २०१७ मध्ये उद्यान विकसित करण्यासाठी त्या भूखंडाचे उद्घाटन देखील केले होते. असे असताना ममदापूर येथे अमरदीप कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यावसायिकाचे सुमारे ३ बिल्डिंगचे काम सुरु आहे. त्यातील एका इमारतीला पाण्याच्या कनेक्शनसाठी या धनदांडग्याने उद्यानाच्या भूखंडाच्या मध्यात जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून त्यातून पाण्याची लाइन नेली आहे. उद्यानाच्या मागील बाजूस अमरदीप या बिल्डिंगला एक कनेक्शन देऊन पुढील दोन पाऊण इंची कनेक्शन दुसऱ्या इमारतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या इमारतीत एकूण ३४ सदनिका असणार आहेत. त्यामुळे पाण्याची कमतरता पडू नये म्हणून नेरळ ग्रामपंचायतीकडून अधिकृतरीत्या हे कनेक्शन घेतल्याचे समजते.
मुख्य म्हणजे राखीव असलेल्या भूखंडातून पाइपलाइन नेण्यासाठी कोणाचीही साधी परवानगी घेण्याची बिल्डरला गरज वाटली नाही. हा सगळा प्रकार स्थानिकांना समजल्यावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. मुळात गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह संपूर्ण कुटुंबांची फरफट सुरु आहे, परंतु बिल्डरांना मुबलक पाणी मिळते आहे हा देखील संशोधनाचा भाग आहे.
>प्राधिकरणाची यासाठी परवानगी घेतलेली नाही. अशी परवानगी देखील देता आली नसती. कारण ममदापूर येथील तो उद्यानासाठी राखीव भूखंड आहे त्यामुळे झालेला प्रकार चुकीचा आहे. संबंधित बिल्डरला नोटीस पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल.
- प्रवीण आचरेकर, तांत्रिक अधिकारी,
नेरळ विकास प्राधिकरण
येथील स्थानिकांना पिण्यासाठी पाणी नाही. आमच्या मुलांची महिलांची पाण्यासाठी फरफट सुरु असताना या बिल्डरलॉबीला पाणी मिळते. त्यातूनही ते राखीव जागेतून पाइपलाइन घेऊन चाललेत. त्यांना जे वाटेल ते हे करणार का ? यांच्या मनमानीला प्राधिकरण आणि ग्रामपंचायत का सहन करते ? मात्र आम्ही गप्प बसणार नाहीत. जे चुकीचे आहे ते आम्ही तिथेच थांबवणार.
- सुनील सोनावळे,
ग्रामस्थ ममदापूर