आता गरीबांसाठीही खासगी शाळा खुल्या
By admin | Published: January 23, 2017 05:38 AM2017-01-23T05:38:59+5:302017-01-23T05:38:59+5:30
इंग्रजी, मराठी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील २५ टक्के आरक्षित जागांसाठी पनवेल तालुक्यात आॅनलाइन
अरूणकुमार मेहत्रे / कळंबोली
इंग्रजी, मराठी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील २५ टक्के आरक्षित जागांसाठी पनवेल तालुक्यात आॅनलाइन मोफत प्रवेश प्रक्रि या फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. दोन हजारांपेक्षा जास्त जागा असल्याने पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत आता वंचित, आर्थिक दुर्बल घटक आणि अपंग विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के या प्रमाणात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील १६ खासगी शाळांमध्ये थेट प्रवेश मिळण्यास मोठी मदत होईल. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे.
पनवेल तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क अवाच्या सवा आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेले पालक आपल्या पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकत नव्हते. ही बाब शासनाच्या समोर आल्यानंतर शासनाने ‘आरटीई’अंतर्गत वंचित घटक (एससी, एसटी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंगांसाठी अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. याबाबतची अंमलबजावणीची सक्ती बंधनकारक असली तरी अनेक शाळांकडून या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.
आता शासनाने याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरु वात केली आहे. पनवेल तालुका गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षापासून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षापासून २५ टक्के प्रवेशप्रक्रि या आॅनलाइन करण्यात आली आहे.
बहुतांशी नामांकित शाळेत मर्यादेपेक्षा अधिक प्रस्ताव येतात त्यामुळे ‘ड्रॉ’ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. तालुक्यातील बहुतांश खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेशप्रक्रि या सुरू झाली आहे. अशा शाळांनी २५ टक्के जागा विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.