उरण : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या संसदेत मांडण्यात येतील, असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी उरण येथे पत्रकार परिषदेतून दिले.उरण येथे शुक्रवारी आनंदी हॉटेलच्या सभागृहात शहर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुनील तटकरे आणि जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष मनोज भगत, भावना घाणेकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी उरणमध्ये पक्षाच्या पिछेहाटीसाठी नेते, पुढारी आणि पदाधिकारीच अधिक जबाबदार कसे आहेत, याची माहिती दिली, तसेच पक्षाकडून पाठबळ मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहच नसल्याच्या आणि अन्याय होत असल्याच्या व्यथाही कार्यकर्त्यांनी मांडल्या.बैठकीनंतर खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेले बदल, जेएनपीसीटी बंदराचे होऊ घातलेले खासगीकरण, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा फेर पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न, नौदलाच्या सेफ्टीझोनचा प्रश्न, जेएनपीटीबाधित शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या संसदेत मांडण्यात येतील, असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
जेएनपीटीचे खासगीकरण रोखणार- सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 11:57 PM