मुलांचा सर्वांगीण विकास साधणारी ‘प्रिआ’ स्कूल; उत्तम शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:00 AM2020-02-03T00:00:45+5:302020-02-03T00:02:32+5:30
सुप्त गुणांना वाव देणारे उपक्रम
रसायनी : अभ्यासाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यासाठी आईवडील, पालकांसह शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण मुलांचे भवितव्यच या शिक्षकांच्या हाती असते. मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा सहभाग असतो. आज अनेक शिक्षण संस्था केवळ व्यवसाय म्हणून शाळा सुरू करतात. मात्र, खालापूर तालुक्यात वासांबे-मोहोपाडा येथील पाताळगंगा एमआयडीसी कामगार वसाहतीतील प्रिआ स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असून, गेल्या ३५ वर्षांपासून शाळेच्या विकासाबरोबरच मुलांचाही विकास होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पाताळगंगा एमआयडीसी कामगार वसाहतीतील पाताळगंगा-रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशन संचलित प्रिआ स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुरुवात बॉम्बे डाइंग लि. कंपनीच्या सभागृहात झाली. सुरुवातीला केवळ दहा विद्यार्थी होते, तर त्यांना मार्गदर्शन करणारे दोन शिक्षक होते. आज या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. आज शाळेची भव्य इमारत उभी असून २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व त्यांना मार्गदर्शन करणारे एकूण ६२ शिक्षक आहेत.
शाळेच्या सभोवती हिरवीगार झाडे, शाळेसमोर भव्य पटांगण, मोठ्या इमारतीत ३० तर इतर इमारतीत नऊ अशा ३९ वर्गखोल्या आहेत. अद्ययावत प्रयोगशाळा, दोन संगणक कक्ष, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पाणी पिण्यासाठी वॉटरप्युरिफायर बसवले आहेत. येथे मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
१०० टक्के निकाल
शाळा गजबजाटापासून दूर शांत ठिकाणी आहे. मनमिळाऊ, अनुभवी शिक्षक,अतिशय रचनात्मक आणि मनोरंजनात्मक शिक्षण देतात. प्रत्येक वर्गासाठी ई-लर्निंग कक्ष आहे, त्यामुळे मुले आनंदाने शिक्षण घेतात. शाळेला दहावीच्या १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे, ही
एक अभिमानाची गोष्ट आहे. यात ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात.
आदर्श शाळा म्हणून परिसरात ओळख
शाळेने आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण केली आहे. येथे शिस्तीला फार महत्त्वाचे स्थान आहे. इतर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत या शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना खर्च कमी असल्याचे पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना चांगले नागरिक बनविणे हाच शाळेचा मुख्य उद्देश आहे. मुलांना घडविण्यासाठी सर्वच शिक्षक प्रयत्न करतात, त्यामुळे आज शाळेची एवढी प्रगती झाली आहे.
- मधू शैलेंद्र, मुख्याध्यापिका
मोहोपाडा येथील प्रिआ स्कूलमधून विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण हे चांगल्या दर्जाचे असून, शाळेतील शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याने विद्यार्थीही अभ्यासाकडे अधिक लक्ष देत आहेत.
- रसिका खराडे, मोहोपाडा