पालीत वाहतूककोंडीची समस्या
By admin | Published: March 22, 2017 01:34 AM2017-03-22T01:34:37+5:302017-03-22T01:34:37+5:30
अष्टविनायक क्षेत्रापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत वाहतूककोंडीची समस्या बिकट होत चालली आहे. अरुंद रस्ते, वाहतुकीच्या
विनोद भोईर / पाली
अष्टविनायक क्षेत्रापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत वाहतूककोंडीची समस्या बिकट होत चालली आहे. अरुंद रस्ते, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, रस्त्याजवळील बांधकामे व अवैध पार्किंगमुळे पालीत कायम वाहतूककोंडी होते. परिणामी पादचारी, विद्यार्थी व भाविकांची प्रचंड गैरसोय होते. यामुळे स्थानिकांकडून पर्यायी रस्त्याची मागणी होत आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलीस व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांची मोठी दमछाक होत आहे.
बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. अनेक भाविक मोटार किंवा मोठ्या खासगी बसेसमधून येतात. येथील अरु ंद रस्त्यांमुळे समोरून वाहने आल्यास या मोठ्या वाहनांना जाण्यास मार्ग मिळत नाही. तसेच अरु ंद वळणावरून या मोठ्या वाहनांना जाताना अडचण येते. परिणामी सर्वच चौकांमध्ये वाहतूककोंडी होते. काही वाहने नोएन्ट्रीमधून प्रवेश करतात त्यामुळे समोरील वाहनास मार्ग काढता येत नाही. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी व मोटार यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या बाजूला असलेली बांधकामे, टपऱ्या व काही घरांचे व दुकानांचे बाहेर आलेले पत्रे यामुळे देखील वाहतुकीस अडथळा येतो. रस्त्यावर आलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडसर येतो. या सर्व कारणांमुळे पालीत वाहतूककोंडीची समस्या बिकट झाली आहे. येथील जुने एसटी स्टँड (महाकाली मंदिर), हनुमान मंदिर, बाजारपेठ, गांधी चौक, बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल या ठिकाणी कायमच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारी, भाविक, विद्यार्थी, वृद्ध यांना येथून मार्ग काढताना गैरसोय होते. तसेच वाहनचालकांना देखील वाहनचालविताना कसरत करावी लागते. सततच्या वाहतूककोंडीवर कायमचा इलाज करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कोकण, मुंबई व पुण्याकडे माणगाव मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना पालीतूनच जावे लागते. कारण माणगावकडे जाण्यासाठी आणि माणगावरून विळेमार्गे मुंबई व पुण्याकडे द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी एकमेव मार्ग पालीतूनच जातो. या मार्गावरून अवैध व ओव्हरलोड वाळू, खडीच्या गाड्यांची वाहतूक होत असते यामुळे देखील वाहतूककोंडी होते.