- अरुण जंगमम्हसळा : अतिशय दुर्गम व डोंगराळ तालुका असून वसलेली गावे देखील डोंगर भागातच आहेत, त्यामुळे या गावातील नागरिक आपल्या गावाजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कायमच अवलंबून असतात. मात्र मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यथा अतिशय वेगळी आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केव्हा डॉक्टरांअभावी नागरिकांची हेळसांड होते तर केव्हा कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे.या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर बुधवारी नवजात बालक तसेच पाच वर्षांच्या आतील बालकांचे लसीकरण केले जाते. तालुक्याच्या ठिकाणी जाणे व येण्याचा होणारा खर्च टाळावा याकरिता या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असलेली जवळपास सतरा ते अठरा गावातील जवळपास पंधरा हजार नागरिक हे केवळ या प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावून आपल्या बालकांचे लसीकरण करतात. मात्र २२ आॅगस्ट रोजी लसीकरणासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी साधारणत: नऊ वाजल्यापासूनच साधारणत: पन्नास ते साठ स्त्रिया आपआपल्या बालकांना लसीकरणाकरिता घेवून आले होते. उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे या बालकांचे लसीकरण दुपारी १ वाजेपर्यंत झालेच नाही. सकाळी उपाशीपोटी निघालेल्या या नागरिकांचा अखेर पारा सुटला व त्यांनी डॉक्टरांसहित असलेल्या परिचारिकेला विचारपूस करीत असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यामुळे त्यांचा पारा सुटलेल्या नागरिकांकडून दवाखान्याची तोडफोड होणार त्याच कालावधीमध्ये रुग्ण कल्याण समितीवर असणारे महेंद्र पारेख तसेच माजी उपसरपंच नदीम कादरी व वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी लसीकरणासाठी आलेल्या स्त्रियांना शांत केले. रुग्णालयातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेवून कामचुकारपणा करणाºया याच रुग्णालयातील कर्मचाºयाविरुद्ध वरिष्ठ अधिकाºयाकडे तक्रार करुन या लसीकरणासाठी खरसई येथे काही दिवसांकरिता नेमणूक केलेल्या परिचारिकेला पाचारण केल्यानंतर दुपारी १वाजल्यानंतर लसीकरण सुरु करण्यात आले. तेव्हा वातावरण काहीसे निवळले व नागरिक शांत झाले.मात्र लसीकरणाकरिता पर्यायी परिचारिका उपलब्ध करुन दिल्याबद्दल उपस्थित असलेल्या जवळपास पन्नास ते साठ स्त्रियांनी रुग्ण कल्याण समितीचे महेंद्र पारेख, माजी सरपंच नदिम कादरी, व श्याम कांबळे यांचे आभार मानले.या महिला कर्मचाºयाविरुद्ध गटविकास अधिकारी प्रभे तसेच सभापती छाया म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकाºयांकडे त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याचे गटविकास अधिकारी प्रभे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ, डॉक्टर नसल्याने हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:47 PM