मुरूडवासीयांनी गांधीगिरी करत मांडल्या समस्या; महावितरणच्या आधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:09 PM2020-09-10T23:09:54+5:302020-09-10T23:11:08+5:30

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाराजी

Problems raised by the people of Murud in Gandhigiri; MSEDCL officials felicitated | मुरूडवासीयांनी गांधीगिरी करत मांडल्या समस्या; महावितरणच्या आधिकाऱ्यांचा सत्कार

मुरूडवासीयांनी गांधीगिरी करत मांडल्या समस्या; महावितरणच्या आधिकाऱ्यांचा सत्कार

Next

आगरदांडा : मुरूड तालुक्याला स्विचिंग सेंटर प्राप्त होऊनसुद्धा दिवसातून अनेक वेळा वीज जात आहे. याबाबत तक्रारदेखील करण्यात आली. मात्र, काही उपयोग झाला नाही. यामुळे मुरूडमधील नागरिकांनी एकत्र येत वीज महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांचा गांधीगिरी करीत शाल, श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.

मुरूड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश भगत यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. या वेळी महेश भगत म्हणाले, मुरूड शहरात स्विचिंग सेंटर असूनसुद्धा शहरातील वीज ही सातत्याने गायब होत असते. त्याचप्रमाणे संपूर्ण शहरात कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होत असल्याने सर्वसामान्यांच्या घरांतील विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सध्या तापमान जास्त वाढल्याने लोकांना घामाच्या धारा लागल्या आहेत आणि अशा कठीण प्रसंगात वीज नसल्यामुळे तसेच मच्छरचे प्रमाणसुद्धा वाढल्याने लोक आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. शाळा व महाविद्यालये बंद असल्याने सध्या विद्यार्थ्यांचा आॅनलाइन अभ्यास सुरू आहे; परंतु दिवसाप्रमाणे रात्रीसुद्धा वीज गायब झाल्याने मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अनेक वेळा निवेदन दिले; परंतु वीज मंडळाच्या कारभारात फरक पडत नसल्याने आम्ही गांधीगिरी करीत फार सोज्वळपणे व शांतता राखून हा सत्कार करीत आहोत.

मुरूड शहर संघटिका सीमा दांडेकर यांनी शासनाने लोकांना दिलेले वीजबिल हे टप्प्याटप्प्याने भरावयास सांगितले असतानासुद्धा वीज कर्मचारी लोकांना थेट रक्कम भरण्याचे सांगत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याबाबतसुद्धा येरेकर यांना सूचना देण्यात आल्या. या वेळी उपस्थित नागरिकांनी कर्मचारी नेमण्यात यावेत, त्याचप्रमाणे वीज कमीतकमी वेळ घालविण्यात यावी, वाढीव वीजबिल त्वरित कमी करून मिळावे, अशा मागण्या येरेकर यांच्याकडे मांडल्या. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरव, उदय चौलकर, बाळकृष्ण गोंजी, कुणाल सतविडकर, शिवसेना महिला तालुका अध्यक्षा शुभांगी करडे, सीमा दांडेकर, स्वप्निल चौलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील दहा कर्मचारीवृंदाच्या बदल्या झालेल्या आहेत. माझ्याकडे आता मनुष्यबळ कमी पडणार आहे. तरीसुद्धा मला कामकाज सांभाळताना मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकांना वीजपुरवठा कायम मिळावा असे आमचे प्रयत्न नेहमीच असतात. यापुढे वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- सचिन येरेकर,
उपकार्यकारी अभियंता

Web Title: Problems raised by the people of Murud in Gandhigiri; MSEDCL officials felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड