पेण : शहरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक पोलीस विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय पेणच्या अंतर्गत रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या दूर होणार नसल्याचे नागरिकांनी येत्या जून महिन्यापर्यंत शाळा सुरू होण्यापूर्वी ही समस्या दूर होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पेण शहरातील प्रमुख रस्त्यावर ग्रामीण तसेच शहरी विभागातील नागरिक खरेदीसाठी बाजारहाट करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ आपापल्या मोटार बाइक घेऊन येतात. मात्र, त्यांची वाहने रस्त्यावर कुठेही उभी केली जातात. या वाहनांच्या पार्र्किं गवर वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस कर्मचारी सक्त कारवाई जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सामान्यपणे ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अतिशय मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूककोंडी होणारे प्रमुख रस्त्यामध्ये पेण- धरमतर रस्ता या मार्गावरून बाहेरून येणारी खासगी तसेच एसटी महामंडळाच्या बसेस, विक्रम मिनीडोर, आॅटो रिक्षा, मोटारसायकल, चारचाकी टॅक्सी या वाहनांची सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत ही समस्या कायम दररोज असते. विशेष करून पेण स्थानक भाजीमंडळ ते रायगड बाजार या दरम्यान वाहनांच्या दाटीवाटीने रांगा लागलेल्या असतात. अशावेळी पदपथावरून चालणारे नागरिक, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना गर्दीतून वाट काढणे अतिशय जिकरीचे ठरते. हीच परिस्थिती या रस्त्यालगत अंतोरा रोड ते नरदास चाळ या रस्त्यापर्यंत वाहतूककोंडी असते. सध्या पालिकेच्या रोड वायडिंग, रस्ता रुंदीकरणाचे काम, नगररचना विभागाच्या डीपीआर मंजूर झालेले आहे. मात्र ते काम पेण-खोपोली रोडवरील चावडीनाका ते आरटीओ आॅफिसपर्यंत झालेले आहे. येथील रस्ता प्रशस्त रुंद झाला असून तशाच प्रकारचे उर्वरित काम येत्या काळात होणार असल्याचे बोलले जाते. मात्र शहरातील रस्त्याचे रुंदीकरण होईपर्यंत या वाहनचालकांना वाहनाची पार्र्किं ग करण्याची शिस्त वाहतूक पोलिसांनी लावणे गरजेचे आहे.
मागील वर्षात पोलिसांनी या बेशिस्त वाहनचालकांवर वाहने पार्र्किं ग करताना जे वेळापत्रक आखले होते. त्यानुसार वाहने पार्र्किं ग केली जात होती. अशाच पद्धतीची शिस्त लावणे सध्या गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सण उत्सवप्रसंगी पेण शहरात अलोट गर्दी उसळत असल्याने भविष्यातील वेळेचे नियोजन करून पोलीस यंत्रणेने पेणच्या वाहतूककोंडीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने येत्या जून महिन्यात शालेय विद्यार्थी परत शाळेत जाणार असल्याने त्या अगोदर पेण शहरातील वाहतूककोंडीची समस्या दूर करावी. अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.