पेणमध्ये आठ लाख गणेशमूर्तींची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:45 AM2017-08-01T04:45:26+5:302017-08-01T04:45:28+5:30
गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये सध्या घराघरांत गणेशमूर्तींवर रंगाचा अखेरचा हात फिरवला जात आहे.
जयंत धुळप।
अलिबाग : गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये सध्या घराघरांत गणेशमूर्तींवर रंगाचा अखेरचा हात फिरवला जात आहे. अमेरिका, दुबई, फ्रान्स आदी देशांतील गणेशोत्सवाकरिता सुमारे ४५ हजार गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत. देशातील विविध राज्यांत इंदूर, हैदराबाद, बडोदा, अहमदाबाद, जयपूर आदी ठिकाणी पोहोचण्याकरिता गणरायांचा प्रवास पेण येथून सुरू झाला आहे. पारंपरिक दोन हजार मूर्तिकार आणि ६ हजार कारागीर त्याचबरोबर घराघरांतील महिला आणि शालेय विद्यार्थी अशा तब्बल २५ ते ३० हजार जणांच्या हस्तकौशल्यातून यंदा ८ लाख गणेशमूर्ती साकारल्या आहेत. यंदाची गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायाची आर्थिक उलाढाल २५० कोटी रु पयांच्या घरात असल्याची माहिती पेणमधील नामांकित तिसºया पिढीचे गणेश मूर्तिकार आणि दीपक कला केंद्राचे संचालक दीपक समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
पेणच्या गणेशमूर्तीची आखणी, रेखीवता आणि कलात्मक रंगकाम यातून मूर्तीमध्ये येणारा जिवंतपणा हा आगळावेगळा असतो. त्याच कारणास्तव येथील मूर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही सुप्रसिद्ध झाल्या आहेत. चार ते पाच पिढ्यांचे गणेश मूर्तिकार या व्यवसायात आहेत. वर्षभरातून केवळ दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात, परंतु त्याच्या निर्मितीकरिता हे गणेशोत्सवाचेच केवळ दहा दिवस वगळता उर्वरित ३५५ दिवस हे सर्व मूर्तिकार आपापल्या कार्यशाळांमध्ये कार्यरत असतात. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना मागणी असताना, पर्यावरणविषयक प्रश्न निर्माण झाल्याने शाडूच्या मातीतून गणेशमूर्ती निर्मितीकडे वळण्याचा कलदेखील मूर्तिकारांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.