रायगड जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा ५० टक्क्यांनी कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 05:25 AM2019-05-05T05:25:51+5:302019-05-05T05:26:05+5:30
बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसतो आहे.
पेण - बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसतो आहे. आधीच उशिरापर्यंत लांबलेली थंडी त्यातच मागील १५ दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी झाले आहे, त्यामुळे एकूण व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील आंबा लागवडीखाली एकूण ४४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २२ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. सुरुवातीला चांगली थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती; परंतु लांबलेली थंडी व वाढलेल्या तापमानाचा आता आंबा पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहेत.
यंदाच्या हंगामात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला पडलेल्या थंडीमुळे उत्पादनक्षम क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर मोहर आला होता; परंतु नंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला. त्यामुळे फलधारणा कमी झाली. याबरोबरच तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे साधारण ७० टक्के मोहर गळून पडला.
यंदा केवळ ५० टक्के मोहरात फलधारणा झाली. मात्र, आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतानाच एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाली. उष्णतेचे परिणाम आंब्यावर झाले. आंब्याचे फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरुवात झाली. आंबा डागाळू लागला. त्यामुळे वातावरणाच्या बदलाशी सामना करताना बागायतदार चिंतातूर झाले.
ते आंबे आंध्र किंवा कर्नाटकातले
रायगड जिल्ह्यातील आंबा उशिरा बाजारात येतो. तळकोकणातला आंबा अजून मुबलक प्रमाणात बाजारात आलेला नाही. सध्या बाजारात जो मोठ्या प्रमाणात आंबा दिसतो आहे, तो कोकणातील हापूस नसून आंध्र प्रदेश व कर्नाटकातील आंबा असल्याचे बागायदार सांगतात.