सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेली पर्यटनस्थळे, गड-किल्ले आणि धार्मिक स्थळे विविध संघटनांच्या मागणीनंतर खुली करण्यात आली आहेत. रायगड किल्ला, पाचाड व महाड शहरातील चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर गेले काही महिने ठप्प झालेला रोजगार दिवाळी सुट्टीत पुन्हा भरभराटीस येईल अशी आशा येथील व्यावसायिकांना निर्माण झाली असतानाच राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या चर्चेने व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.
देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पर्यटन स्थळे, मंदिरे व संरक्षित राष्ट्रीय स्मारके पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेले पाचाड व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा लढा दिलेले महाडचे चवदार तळे ही महत्त्वाची स्थळेही बंद करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी टाळेबंदी उठविण्यात आली. मात्र, महाडमधील ही संरक्षित स्थळे यानंतरही सर्वांसाठी बंद होती. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.
रायगड व पाचाड परिसरात मोठी हॉटेल्स नाहीत. परंतु लहान-मोठे सुमारे २०० व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणारी सुमारे ५०० कुटुंबे आपली उपजीविका करीत असतात. गेले आठ महिने येथील हॉटेल व्यवसाय, निवास व्यवस्था, लहान-मोठी विक्रेत्यांची दुकाने, दही, ताक विकणारे, सरबत विकणारे छोटे व्यावसायिक, वडापावची टपरी या सर्वांना गळती लागली होती. व्यवसाय ठप्प झाल्याने पुढे करायचे काय? हा गंभीर प्रश्न व्यावसायिकांपुढे होता. टाळेबंदीनंतरही ही स्थळे सुरू न झाल्याने काही संघटना याबाबत आवाज उठवू लागल्या. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे व संरक्षित स्थळे सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रायगड किल्ला सुरू झाल्यानंतर स्थानिक पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. मात्र बाहेरील पर्यटक येण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकांच्या मनात कोरोनाची भीतीदेखील निर्माण झाली आहे.
स्थानिकांमध्ये भीतीदिवाळीनंतर काही भागात पडणाऱ्या थंडीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली होती. त्यातच लसीकरणदेखील लांबणीवर पडले आहे. आजही दिल्लीमध्ये कोरोनाची स्थिती बिघडलेलीच आहे. शिवाय राज्यातदेखील अनेक भागांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुढील दोन महिन्यांत जाणवणारा धोका लक्षात घेता गड-किल्ले सुरू करण्याच्या निर्णयावर शंकादेखील व्यक्त केली जात आहे. पर्यटकांची ये-जा सुरू झाल्यास याचा प्रसार ग्रामीण भागात होण्याचा धोका आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे गड-व्यावसायिक आनंदी असले तरी भीतीच्या छायेत आहेत.
आठ महिने आम्ही कसे काढले हे आम्हालाच ठाऊक. रायगडचे महत्त्व वेगळे असल्याने पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र येणाऱ्या पर्यटकांनी नियम पालन करून कोरोनाचा प्रसारदेखील रोखला पाहिजे.- अमर सावंत, विक्रेता