रायगडात रील्सना ‘नो ढील’; जिल्ह्यात धोकादायक ठिकाणी बंदी; उल्लंघन केल्यास हाेणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:37 AM2024-07-19T05:37:06+5:302024-07-19T05:37:19+5:30
पर्यटकांच्या या रील्सगिरीला आळा घालण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तसे आदेश काढले आहेत.
अलिबाग :रायगड जिल्ह्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवाई पसरली आहे. शिवाय जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांतून धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओढा जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळांकडे वाढू लागला आहे. त्यातच धबधब्यांच्या ठिकाणी, डोंगरदऱ्यांच्या कुशीत रील्स तयार करून आपल्या इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याचा ट्रेण्डही वाढत आहे.
पर्यटकांच्या या रील्सगिरीला आळा घालण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यानुसार धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात रील्स तयार करून स्टंट करण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे.
‘ती’ कोसळली ३०० फूट खोल दरीत
कुंभे येथील दरीच्या बाजूला अन्वी ही इन्स्टाग्रामसाठी रील्स बनवत होती. मात्र, ही तिची शेवटची रील्स ठरली. रील्स बनविण्याच्या नादात ती पाय घसरून ३०० फूट खोल दरीत कोसळली. बचाव पथकाने तिला शोधून रुग्णालयात दाखल केले होते.
अन्वीच्या मृत्यूनंतर प्रशासनाची दखल
माणगाव तालुक्यातील कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या रील्स स्टार अन्वी कामदार हिचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाला. मंगळवारी घडलेल्या या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत वरीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेताना काहीजण हुल्लडबाजी आणि अति साहस करतात. त्यामुळे जीव गमावण्याच्या घटनाही घडत आहेत. अन्वी कामदार हिचा रील्स तयार करताना कुंभे येथे दरीत पडून मृत्यू झाला. ती पाच सहकाऱ्यांसोबत पर्यटनास आली होती.
रील्स बनविण्याच्या नादात अन्वी हिला जीव गमवावा लागला. अनेक पर्यटक असे साहसी कृत्य करून स्वत:च्या जिवाला धोका निर्माण करीत आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळांवर रील्स बनविणे, साहसी कृत्य करण्यास बंदी असून, जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
आदेशाचे पर्यटकांनी पालन करावे, आदेशाची पायमल्ली केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.