डॉक्टरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:26 PM2019-06-17T23:26:22+5:302019-06-17T23:26:39+5:30
आंदोलनाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठराव पारित; जिल्हाभरात ठिकठिकाणी डॉक्टरांनी पुकारला बंद
अलिबाग : केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करावा. वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने देखील आयएमएला पाठिंबा दिला आहे. सर्व सदस्य देशांनी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तातडीने कडक कायदे करावेत अशा मागणीच्या ठरावाला सर्व डॉक्टरांनी पाठिंबा दिला. मेडिकल असो. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळवण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांवर केलेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये अनेक डॉक्टर्स गंभीर जखमी झाले होते. त्याच्या निषेधार्थ सोमवारी रायगड मेडिकल असोसिएशनमधील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. निषेधाचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी हिराकोट तलावाजवळ आंदोलक डॉक्टरांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यामध्ये महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले.
डॉक्टरांवर जमावाकडून असे हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही अत्यंत चिंतेची व निंदनीय बाब आहे.
आजकाल वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. आयएमएने वेळोवेळी या विरु द्ध आवाज उठविला आहे. देशभरात सर्व डॉक्टर्स काळ््या फिती लावून काम करतील, तसेच जागोजागी धरणे धरणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे तेथील रुग्ण वेठीस धरले जातात. तसेच अशा गोष्टींमुळे रु ग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीच्या खाली असल्याने त्यांची कार्यक्षमता देखील खालावते. याचा थेट रु ग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणताही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रु ग्णांना आपल्या रुग्णालयात दाखल करण्यास तयार होणार नसल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी आयएमए अलिबागचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर, सचिव डॉ. संजीव शेटकार, डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. किरण नाबर, डॉ. विनायक पाटील, डॉ.मोहन रानवडे, डॉ. राजीव धामणकर, डॉ. तिवारी आदी उपस्थित होते.
डॉक्टरांना मारहाणप्रकरणी खोपोलीत निषेध
खोपोली : पश्चिम बंगालमधील एनआरएस मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांना मारहाणीचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील इमा या राज्यव्यापी संघटनेने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील डॉक्टरांनी एक दिवस रुग्णालय बंद ठेवून निषेध व्यक्त केला. यासंबंधीचे निवेदन संघटनेच्या वतीने खोपोली नगरपालिका, तहसीलदार खालापूर व खालापूर पोलीस ठाणे याठिकाणी देण्यात आले. पश्चिम बंगालमधील एनआरएस मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांना १० जून रोजी रुग्णांच्या नातेवाइकांकडून बेदम मारहाण केली. यात एका डॉक्टरचा मृत्यू झाला, तर दुसरे डॉक्टर मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेचे संपूर्ण भारतभर पडसाद उमटले. डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या इमा संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. खोपोली व खालापूर तालुक्यातील डॉक्टरांनी सोमवारी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून निषेध व्यक्त करीत तहसीलदार, पोलीस ठाणे, व नगरपालिका या शासकीय कार्यालयांना निवेदन दिले. संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. सुनील डोंगरे, डॉ. सुभाष कटकदौंड, डॉ. सतीश जाखोटीया, डॉ.संजय साबणे, डॉ. शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीतील अनेक डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते.
नागोठण्यातील डॉक्टर संपात सहभागी
नागोठणे : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपाला नागोठणेतील डॉक्टरांनी सोमवारी पाठिंबा देत आपले दवाखाने दिवसभर बंद ठेवले. बंदमध्ये शहरातील सर्वच्या सर्व डॉक्टरांनी सामील होत दवाखाने तसेच रुग्णालये बंद ठेवून आपला निषेध नोंदविला. शहरातील २२ डॉक्टर या बंदमध्ये सहभागी झाले होते.
मुरुडमधील दवाखाने बंद
मुरुड जंजिरा : तालुक्यातील सर्व दवाखाने सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे काही रुग्णांची गैरसोय झाली. कोलकाता येथे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा जंजिरा मेडिकल असोसिएशन मुरुडतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यासंदर्भात कायदा होऊनही त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुरुड तालुक्यातील सर्व डॉक्टर्सने संपात सहभाग घेऊन खाजगी दवाखाने बंद ठेवले होते. जंजिरा मेडिकल असोसिएशनतर्फे मुरुड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.