मुंबईतील वीज पुरवठा ठप्प होऊ नये म्हणून हजार मेगावाट क्षमतेचा प्रकल्प उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:35 PM2020-10-22T20:35:54+5:302020-10-22T20:40:16+5:30
Nitin Raut : एक हजार मेगावाट क्षमतेचा वायू विद्युत निर्मिती केंद्र येत्या 2 वर्षात उभे करण्याच्या सूचना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.
उरण (रायगड) - मुंबईतील वीज पुरवठा 12 ऑक्टोबरला ठप्प झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. यासाठी उरण येथेच प्रकल्पातील रिक्त जागेवर नवा किमान एक हजार मेगावाट क्षमतेचा वायू विद्युत निर्मिती केंद्र येत्या 2 वर्षात उभे करण्याच्या सूचना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.
यासंदर्भात लवकरात लवकर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राऊत यांनी आज उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली. या वेळेस त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात आले. या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल यावेळेस सखोल चर्चा करण्यात आली.
"मुंबईत पीक टाईमला सध्या वीजेची गरज 2500 मेगा वाट असते आणि 2030 ला ही गरज 5 हजार मेगावट असेल. तसेच 12 ऑक्टोबरला झालेली वीज बंद होण्याची घटना लक्षात घेता मुंबई आणि परिसरात वीज निर्मिती होणे गरजेची आहे. मात्र सध्या केवळ सर्व कंपन्याची मिळून केवळ 1300 मेगावाट वीज निर्मिती होते. 12 ऑक्टोबरला मुंबई बाहेरून होणारा वीज पूरवठा ठप्प झाल्याने आणि मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली. मुंबई अंधारात गेली. हे टाळण्यासाठी उरण येथे किमान 1 हजार मेगा वाट चा वीज प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा पक्रल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत", असे डॉ राऊत यांनी सांगितले.