प्रकल्पग्रस्तांनी भर समुद्रातच रोखली जेएनपीटीची वाहतूक; ग्रामस्थांची समुद्री लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:12 AM2021-02-27T00:12:12+5:302021-02-27T00:12:28+5:30
ग्रामस्थांची समुद्री लढाई : छोट्या बोटींनी अडविला जहाजांचा रस्ता
उरण : तब्बल ३५ हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचे काम कागदावरच राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी (२६) भल्या पहाटेच थेट जेएनपीटीच्या समुद्र चॅनलवरच जोरदार चढाई केली. मध्यरात्रीपासून नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. असे असतानाही पोलिसांना चकवा देत ४० बोटी आणि शेकडो महिला, पुरुष आंदोलनकर्त्यांनी जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून भर समुद्रात मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला. छोट्या-मोठ्या पारंपरिक मच्छीमार बोटी समुद्रात नांगरून जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून टाकले.
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी आणि त्याचे हरेश कोळी, वैभव कोळी यांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना कळंबोली येथे पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. सध्या जेएनपीटी अधिकारी, पोलीस, महसुली अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आंदोलनापासून रोखण्यासाठी महिला पुरुष आंदोलनकर्त्यांना जेरबंद केले. पोलीस, निमलष्करी दले, अनेक वाहनांचा हनुमान कोळीवाडा गावाला वेढा पडला होता. तरीही महिलांनी गावाच्या वेशीवरच ठिय्या मांडला होता. त्यामुळे सुमारे २०० महिला आणि १५० पुरुष आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना जेएनपीटी टाऊनशिपमधील ऑफिसर क्लबमध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी मोरा सागरी प्रवासी वाहतूकही बंद केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना चकवा देत गनिमी काव्याचा वापर केला. आंदोलनासाठी दोन दिवसांपूर्वीच ४० मच्छीमार बोटी वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज करून ठेवल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.