आरसीएफ विरोधात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
By admin | Published: August 24, 2015 02:33 AM2015-08-24T02:33:07+5:302015-08-24T02:33:07+5:30
आरसीएफ प्रशासनाने गेली ३० वर्षे १४२ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. कंपनीचे विस्तारीकरण न झाल्याने प्रश्न
अलिबाग : आरसीएफ प्रशासनाने गेली ३० वर्षे १४२ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. कंपनीचे विस्तारीकरण न झाल्याने प्रश्न अजून गंभीर बनला आहे. आरसीएफ प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जमीन नाही आणि नोकरीही नाही अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील बोरीस, गुंजीस, थळ, वायशेत अशा सुमारे १२ गावांतील शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी थळ प्रकल्पासाठी दिल्या होत्या. यातील १४२ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही कायम आहेत. मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी उपोषण, मोर्चे आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी स्वत:च्या स्वार्थापुरता पाठिंबाही दिला मात्र प्रश्न काही सोडविले नाहीत, अशी धारणा प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. खासदार तथा अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या अध्यक्षतेखाली आरसीएफ प्रशासनासोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय झाला होता, तरीही कंपनीने तो निर्णय धाब्यावर बसविला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर कंपनीच्या विस्तारीकरणानंतर प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन आरसीएफ प्रशासनाने दिले होते. प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे सुनील सप्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)