उरण : तब्बल वर्षे ३५ हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचे काम कागदावरच राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी (२६) भल्या पहाटेच थेट जेएनपीटीच्या समुद्र चॅनलवरच जोरदार चढाई केली. मध्यरात्रीपासून नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. असे असतानाही पोलिसांना चकवा देत ४० बोटी आणि शेकडो महिला, पुरुष आंदोलनकर्त्यांनी जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून भर समुद्रात मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला.
२५६ घरांना लागलेल्या वाळवीमुळे फेर पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना जेएनपीटीने पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडले आहे. पुनर्वसन कायद्यानुसार पायाभूत सोयी-सुविधांसह सुमारे १७ हेक्टर जागेच्या प्रस्तावावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम आहेत. यासाठी ग्रामस्थांचा जेएनपीटी, केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार संघर्ष सुरू आहे. उरण तहसीलदारांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पोहचविण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शिवसेनेच्या माध्यमातून हा विषय केंद्र सरकारकडे नेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांच्या माध्यमातून राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चेच्या फेऱ्याही झडल्या. मात्र त्यातूनही आश्वासनांशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी २१ जानेवारी रोजी जेएनपीटी समुद्र चॅनेल बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
मात्र जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि डीसीपी शिवराज पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र महिनाभराच्या प्रतीक्षेनंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या १७ हेक्टर पुनर्वसन जागेचा प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार आणि जेएनपीटी अपयशी ठरले. त्यामुळे संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी पहाटे पासूनच जेएनपीटी विरोधात चॅनेल बंद आंदोलन सुरू केले आहे.