निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त
By निखिल म्हात्रे | Published: May 5, 2024 10:30 PM2024-05-05T22:30:54+5:302024-05-05T22:31:53+5:30
याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
अलिबाग : ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. आतापर्यंत आचारसंहिताभंगाबाबत ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १९० पोलिस अधिकारी, २ हजार ६० कर्मचारी, १ हजार ४२५ होमगार्ड, ६० आरपीसी, २३ क्युआरटी तैनात केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
रायगड मतदारसंघात १६ लाख ६८ हजार ३७२ मतदार आहेत. यामध्ये पुरुष ८ लाख २० हजार ६०५ आणि महिला ८ लाख ४७ हजार ७६३ आणि तृतीयपंथी ४ आहेत. तर जिल्ह्यात २ हजार १८५ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी विविध ठिकाणी पोलिसांची पथसंचलन झाली आहेत. याव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडी तैनात केली आहे. जिल्ह्यात नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर बिनतारी संदेश यंत्रणा बसविण्यात आली आहे.
सहा केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त
अलिबाग दोन, श्रीवर्धन १, दापोली १, गुहाघर विधानसभा मतदारसंघातील दोन अशी सहा मतदान केंद्रे ही क्रिटिकल पोलिंग स्टेशन म्हणून निश्चित केली आहेत. येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील केंद्र नाही.
अचारसंहिताभंगाचे सहा गुन्हे दाखल
आचारसंहितेचा भंग केला म्हणून आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खारपाडा येथे एका महिलेने तपासादरम्यान कॅमेरा फोडला, दिघी सागरीमध्ये एका लग्नादरम्यान दोन ग्रुपमध्ये झालेली भांडणे, महाडमध्ये १ तर मतदानासंदर्भात एक ऑडिओ फिरत असल्याने सुमोटा दाखल करण्यात आला आहे.